नवी दिल्ली : वृत्तसंस्था
महिला कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण केल्याच्या गंभीर आरोपांचा सामना करणारे उत्तर प्रदेशातील कैसरगंज लोकसभा मतदारसंघाचे विद्यमान खासदार बृजभूषण शरण सिंह यांचे तिकीट भाजपने कापले आहे. परंतु त्यांचे पुत्र करण भूषण सिंह यांना भाजपने उमेदवारी देण्याची घोषणा गुरुवारी केली. रायबरेली मतदारसंघात भाजपने दिनेश प्रताप सिंह यांना उमेदवारी दिली आहे.
भाजपने उत्तर प्रदेशातील कैसरगंज मतदारसंघातील आपला उमेदवार जाहीर केला. यावेळी लैंगिक शोषणाच्या आरोपांमुळे प्रतिमा मलीन झालेले बृजभूषण सिंह यांना भाजपने दूर सारले आहे. लैंगिक शोषणाचा आरोप करीत महिला कुस्तीपटूंनी गेल्या वर्षभरात दिल्लीत आंदोलन केले. त्यामुळे भाजपने त्यांना उमेदवारी देणे टाळले आहे. परंतु बृजभूषण शरण सिंह यांच्याऐवजी त्यांचा ३४ वर्षीय धाकटा मुलगा करण सिंह यांना भाजपने कैसरगंजमधून रिंगणात उतरवले आहे. करण सिंहचा जन्म १३ डिसेंबर १९९० साली झाला आहे.