पुणे : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक शहरात अपघाताच्या नियमित मालिका सुरु असून नुकतेच शिरूरमध्ये एक भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडीमध्ये भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर थेट दुकानांमध्ये घुसल्याची घटना घडली आहे. मात्र सुदैवाने रात्रीची वेळ असल्याने मोठा अनर्थ टळला. या अपघाताचा थरार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी येथे रात्रीच्या वेळी पोकलेन घेऊन जाणारा ट्रेलर थेट सलूनच्या दुकानात घुसल्याची दुर्घटना घडली. महामार्गावर ट्रेलर चालकाचा ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. अपघातावेळी सलून व्यवसायिक हे आपले दुकान बंद करून घरी गेले होते, तसेच वर्दळीच्या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला.
तसेच या अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. या अपघातामध्ये सलोन व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. तर आजूबाजूच्या लोकांच्या जीवितलाही धोका निर्माण झाला होता. समोर आलेल्या व्हिडिओमध्येही भरधाव ट्रेलर अचानकच रस्ता ऊलुंधून दुकानात घुसल्याचे दिसत आहे. दरम्यान, या घटनेमुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला आहे. वाहन चालकाकडून नुकसान भरपाईसह कठोर कारवाई करण्याची मागणी सरदवाडी ग्रामस्थांनी केली आहे. या थरारक घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे. ज्यामध्ये भरधाव ट्रेलर थेट सलूनच्या दुकानामध्ये शिरल्याचे दिसत आहे. मात्र मोठा अनर्थ टळला.