नवी दिल्ली : वृत्तसंस्था
नरेंद्र मोदी देशाच्या तिसऱ्यांदा पंतप्रधान बनण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नरेंद्र मोदी यांनी नुकतीच राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रपतींनी सत्ता स्थापनेसाठी निमंत्रण दिलं होतं. मोदींनी राष्ट्रपतींकडे एनडीएच्या घटक पक्षांनी दिलेल्या पाठिंब्याचं समर्थन पत्र सुपूर्द केलं. यानंतर आता मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, येत्या 9 जूनला मोदींच्या शपथविधीचा कार्यक्रम पार पडणार आहे. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय पातळीवर घडामोडींना वेग आला आहे. राष्ट्रपती कार्यालयाकडून मोदींच्या शपथविधीच्या कार्यक्रमासाठी तयारी सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मोदी ज्या दिवशी शपथ घेतील त्या दिवशी संबंधित परिसरात विमानांना हवेत घिरट्या घेण्यास बंदी असणार आहे.
नरेंद्र मोदी यांच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कलम 144 लागू करण्यात आलं आहे. मोदींच्या शपथविधीआधी नो फ्लाय झोन घोषित करण्यात आलं आहे. नरेंद्र मोदी 9 जूनला संध्याकाळी 7 वाजून 15 मिनिटांनी पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहेत. मोदींच्या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी करण्यात आली आहे. तसेच तगडा पोलीस बंदोबस्तही तैनात आहे.
दरम्यान, एनडीएच्या घटकपक्षांची आज महत्त्वाची बैठक आज संसद भवनच्या सेंट्रल हॉलमध्ये पार पडली. यावेळी नरेंद्र मोदी यांची एनडीएचा संसदीय नेता म्हणून निवड करण्यात आली. यानंतर संध्याकाळी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी भाजप नेते अमित शाह यांच्या उपस्थितीत एनडीएच्या प्रत्येक पक्षाच्या प्रमुखासोबत बैठक पार पडली. या बैठकीत खातेवाटप आणि मंत्रिमंडळावर चर्चा झाली. एनडीएमधील हे बैठकांचं सत्र आज दिवसभर चाललं. यानंतर आता उद्या एनडीएच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला ठरणार आहे.