ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधानसभेला पवारांचा हा नेता देणार अजित दादांना टक्कर !

पुणे : वृत्तसंस्था

देशातील लोकसभा निवडणुकीत यंदा राज्यातील बारामती मतदार संघ मोठ्या चर्चेत आला होता. लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी आता संपली आहे. आता वेध लागले आहेत ते म्हणजे विधानसभा निवडणुकीचे. राज्यात आता अवघ्या काही महिन्यांमध्येच विधानसभेची निवडणूक होणार आहे. यंदा बारामती लोकसभेची निवडणूक चांगलीच गाजली. पहिल्यांदाच या निवडणुकीमध्ये पवार कुटुंबातील दोन सदस्य आमने-सामने आले. सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात होत्या.

दरम्यान आता विधानसभा निवडणुकीमध्ये देखील पवारांविरोधात विरोधात पवार असा सामना रंगण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवार म्हणून युगेंद्र पवार यांच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. युगेंद्र पवार यांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली. बारामती विधानसभा निवडणुकीसाठी पक्षाकडून युगेंद्र पवार यांना संधी द्यावी अशी मागणी कार्यकर्त्यांकडून शरद पवार यांच्याकडे करण्यात आली आहे.

माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार हे आजपासून तीन दिवसांच्या बारामतीत दौऱ्यावर आहे. याचदरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांच्या सत्तर कार्यकर्त्यांनी शरद पवार यांची भेट घेतली आहे. युगेंद्र पवार यांना पक्षाकडून बारामती विधानसभा मतदासंघातून उमेदवार द्यावी अशी मागणी या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता शरद पवार काय निर्णय घेणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीकडून सुनेत्रा पवार यांना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं होतं. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे या रिंगणात होत्या. ही निवडणूक आरोप-प्रत्यारोपामुळे चांगलीच गाजली. अटीतटीच्या या निवडणुकीत सुप्रिया सुळे यांनी सुनेत्रा पवार यांचा पराभव केला. त्यामुळे पुन्हा एकदा आता पवारांविरोधात पवार असा सामना पाहायला मिळणार का हे पाहावं लागणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!