मुंबई : वृत्तसंस्था
तीन दिवसांत चांदी दोन हजार ५०० रुपयांनी वधारली आहे; त्यामुळे शुक्रवारी चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली. या सोबतच सोनेही तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारून ७३ हजार रुपये प्रति तोळ्यावर पोहोचले आहे.
मे महिन्यात मोठी भाववाढ होऊन ९४ हजारांपर्यंत पोहोचलेल्या चांदीच्या भावात जून महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून घसरण सुरू झाली होती. १४ जून रोजी चांदी ८८ हजार ५०० रुपयांवर आली होती. त्यानंतर चार दिवस पुन्हा चढ-उतार सुरू राहिला व १८ रोजी ती ८९ हजार रुपयांवर आली. १९ व २० जून रोजी प्रत्येकी एक एक हजार रुपयांची वाढ होऊन चांदी ९१ हजार रुपयांवर पोहोचली. शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ झाली व चांदी ९१ हजार ५०० रुपये प्रति किलोवर पोहोचली.
दुसरीकडे सोन्याचेही भाव तीन दिवसात ८०० रुपयांनी वधारले आहेत. १९ जून रोजी ७२ हजार २०० रुपयांवर असलेल्या सोन्यात २० रोजी ३०० रुपयांची वाढ होऊन ते ७२ हजार ५०० रुपयांवर पोहोचले. त्यानंतर शुक्रवारी पुन्हा ५०० रुपयांची वाढ होऊन सोने ७३ हजार रुपये प्रति तोळा झाले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दलालांनी अचानक मागणी वाढवल्याने सोने- चांदीच्या भावात वाढ होत असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांचे म्हणणे आहे.