मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील महाविकास आघाडीने आता विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरु केली आहे तर दुसरीकडे भाजपने देखील विधानसभेच्या पार्श्वभूमीवर कंबर कसली आहे. त्यातच मुंबईत घडामोडींना वेग आला आहे. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक मुंबईतील सागर या निवासस्थानी झाली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. तसेच पुन्हा एक कोअर कमिटीची बैठक होणार असल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. बैठकीनंतर त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला आहे.
यावेळी बोलतांना त्यांनी बैठकीत काय घडले याबाबत सांगितले आहे. ”लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ही एक विश्लेषणात्मक बैठक होती. ज्या ठिकाणी आम्ही मागे पडलो, त्या ठिकाणी पुन्हा एकदा संघटना वाढवणार आहे. केंद्र सरकार राज्य सरकारच्या योजना या समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याकरता काय केले पाहिजे, यावर चर्चा केली”, असे बावनकुळे म्हणाले.
यावेळी विधानपरिषदेबाबत देखील बावनकुळे यांनी माहिती दिली आहे. ” बैठकीत विधान परिषदेच्या निवडणुकांवरही चर्चा झाली. सामाजिक भौगोलिक परिस्थितीच्या आधारावर आणि आणखी काही निकष लावून चर्चा झाली. आम्ही यादी केंद्राकडे पाठवू आणि केंद्र त्यावर निर्णय घेईल”, असे बावनकुळे म्हणाले. तसेच राज्यात सध्या तापलेल्या असलेल्या ओबीसी आंदोलनावर चर्चा झाली नसल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले आहे. ”मराठा आरक्षण ओबीसी आरक्षण या विषयावर चर्चा झालेली नाही. तो सरकारचा विषय आहे ही संघटनात्मक बैठक होती” असे बावनकुळे म्हणाले. मात्र ज्या ठिकाणी आम्ही कमी पडलो तिथे पुन्हा एकदा जनतेचा विश्वास जिंकणार असेही ते म्हणाले.