ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भुजबळ यांना दगडफेक करण्याचा नाद ; जरांगे पाटलांचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाचा वाद पेटला असतांना बीडच्या मातोरी गावात गुरुवारी रात्री 2 समाजांत झालेल्या दगडफेकीच्या घटनेवर मनोज जरांगे पाटील यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या घटनेला त्यांनी ओबीसी नेते तथा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना जबाबदार धरले आहे. मातोरी येथील घटना घडवून आणण्यात आली आहे. छगन भुजबळ यांना दगडफेक करण्याचा नाद त्यांना माझेच गाव सापडले का? असा सवाल त्यांनी या प्रकरणी उपस्थित केला आहे.

मनोज जरांगे यांच्या मातोरी गावात गुरुवारी रात्री लक्ष्मण हाके समर्थक व ग्रामस्थांत दगडफेक झाली. या घटनेमुळे गावात तणाव निर्माण झाला आहे. मनोज जरांगे यांनी शुक्रवारी सकाळी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना या घटनेवर संताप व्यक्त केला. तसेच त्याचे खापर मंत्री छगन भुजबळ यांच्या डोक्यावर फोडले. मला दगडफेक झाल्याची माहिती मिळाली. हा प्रकार घडवून आणल्याची शंका आहे. छगन भुजबळ यांना दगडफेक करण्याचा नाद आहे. मी त्याची माहिती घेतो. पण भुजबळांना माझेच गाव सापडले का? असा प्रश्न आहे, असे जरांगे म्हणाले.

छगन भुजबळांनी आंतरवाली सराटीतही माझ्या आंदोलनापुढे बसायला लावले. ते आंदोलन सरकार पुरस्कृत होते हे आता सिद्ध झाले आहे. भुजबळांना असे करण्याची सवय आहे. ते असे हटकून करतात. ते मुद्दाम वाट्याला येतात. दंगल घडवून आणण्यासाठी, जाती-जातीत तेढ निर्माण करण्यासाठी त्यांनी आंदोलन केले, असेही जरांगे यावेळी बोलताना म्हणाले.

मी आंतरवाली सराटीत ओबीसी – मराठ्यांत वाद होऊ दिला नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या गावी जाऊन असा प्रकार घडवला. आंतरवाली सराटीत मी गाड्या फोडू दिल्या नाही. त्यामुळे त्यांनी माझ्या गावात जाऊन असे केले. भुजबळांनी गाड्या फोडून आरोप गरिबांवर करण्याचे सांगितले आहे. पण माझ्या बीड जिल्ह्यातील एकाही मराठा बांधवाला त्रास होता कामा नये. हा मला बदनाम करण्याचा डाव असू शकतो. पालकमंत्र्यांनी यात लक्ष घातले पाहिजे, असेही मनोज जरांगे यावेळी भुजबळांवर शरसंधान साधताना म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!