पुणे : वृत्तसंस्था
संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरू श्रीतुकाराम महाराज यांच्या पुणे मुकामी असलेल्या पालख्यांच्या दर्शनासाठी सोमवारी मध्यवस्तीतील नाना, भवानी या दोन्ही पेठांमध्ये भाविकभक्तांचा जनसागर लोटला होता.
भाविकांसोबतच सोमवारी राजकीय नेत्यांसह व्हीव्हीआयपींनीदेखील हजेरी लावल्याचे पाहायला मिळाले. ‘माउली माउली’चा जयघोष करीत नाना पेठ येथील निवडुंग्या विठोबा आणि भवानी पेठ येथील पालखी विठोबा मंदिरांमध्ये दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती. त्यामुळे या दोन्ही मंदिर परिसरामध्ये सोमवारी लांबच लांब रांगा लागल्याचे पाहायला मिळाले.
ठिकठिकाणी लागलेल्या खेळण्यांच्या दुकानांमुळे भवानी पेठ आणि नाना पेठेला जत्रेचे स्वरूप आले होते. दरम्यान, पालख्यांसोबत आलेल्या वारकऱ्यांनी पेठ परिसरात विविध ठिकाणी आपला मुक्काम ठोकला होता. त्यामुळे वारकरी आणि त्यांच्या वाहनांमुळे पुणे शहरातील मध्यवस्तीतील वातावरण भक्तिमय झाले होते. सर्वत्र विठुनामाचा जयघोष कानी पडत होता.