शेतकऱ्यांनी माती परीक्षणाला महत्त्व देऊन खताचा समतोल वापर करावा
अक्कलकोट पंचायत समितीत कृषी दिन साजरा
अक्कलकोट ; तालुका प्रतिनिधी
दि.१ : शेतकरी बांधवांनी शासकीय योजनेबरोबर शेती विषयीचे तांत्रिक ज्ञान घेणे महत्त्वाचे आहे.शेतकऱ्यांनी माती परीक्षणाला महत्त्व द्यावे व त्यानुसार खताचा समतोल वापर करावा,असे आवाहन गटविकास अधिकारी गट विकास अधिकारी शंकर कवितके यांनी केले.
सोमवारी,महाराष्ट्र शासन कृषी विभाग व पंचायत समिती अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने पंचायत समिती सभागृह येथे कै.वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.त्यावेळी ते बोलत होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना तालुका कृषी अधिकारी हर्षद निगडे म्हणाले, कृषी विभागाच्या महाडीबीटी पोर्टल वरील विविध योजनांचा व महात्मा गांधी ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत १०० टक्के अनुदानावर फळबाग लागवड नाविन्यपूर्ण बाब म्हणून शेतीला रेशीम उद्योगाची जोड द्यावी.रेशीम उद्योगासाठी शासनाने एकरी चार लाख रुपये पर्यंत अनुदान देत आहे.तसेच खरीप पिक विमा भरणे सुरू झाले असून शेतकऱ्याने एक रुपयामध्ये आपल्या पिकांचा शंभर टक्के विमा उतरून घ्यावा,असे आवाहन केले.त्यानंतर पंचायत समितीचे कृषी अधिकारी सचिन चव्हाण यांनी उपस्थिताना मार्गदर्शन करताना कृषी सेवा केंद्र चालकांनी शेतकऱ्यांना निविष्ठा पुरवताना योग्य तांत्रिक असे मार्गदर्शन करूनच गरजेनुसार निविष्ठा पुरवाव्यात तसेच सेंद्रिय शेतीसाठी आवश्यक असणारे घटक वापरणे गरजेचे असून सेंद्रिय उत्पादनासाठी सेंद्रिय शेतीचे प्रमाणिकरण करणे बाबत शेतकऱ्यांना आवाहन केले.यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कृषी सेवा केंद्र चालक असोसिएशनचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, उपाध्यक्ष अजित तालीकोठी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आनंद कांबळे यांनी केले तर आभार शिवानंद देगील यांनी केले. कार्यक्रम पार पाडण्यासाठी जयानंद माने आणि बी.के गुरव यांनी सहकार्य केले. यावेळेस उपस्थित कृषी विभागाचे सर्व अधिकारी, कर्मचारी, पंचायत समितीचे सर्व अधिकारी, कर्मचारी, शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.