मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात सध्या मराठा व ओबीसी समाजाच्या आरक्षणाची चर्चा सुरु असतांना नुकतेच मनोज जरांगे पाटलांच्या आंतरवाली सराटी स्थित घरावर सोमवारी रात्री एका अज्ञात ड्रोनने घिरट्या घातल्या. यामुळे मनोज जरांगे यांची टेहळणी केली जात असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. आंतरवालीच्या गावकऱ्यांनी या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मनोज जरांगे पाटील सध्या आंतरवाली सराटीच्या सरपंचाच्या घरी मुक्कामी आहेत. सोमवारी मध्यरात्री त्यांचा मुक्का असलेल्या घरावर एक ड्रोन घिरट्या घालत असल्याचे दिसून आले. मनोज जरांगे यांनी स्वतः गच्चीवर जाऊन या ड्रोनची पाहणी केली. त्यानंतर ग्रामस्थांशी चर्चाही केली. या प्रकरणी आंतरवाली सराटीचे सरपंच तथा गावकऱ्यांनी पोलिसांकडे तोंडी तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे पोलिस आज घटनास्थळी जाऊन पाहणी करणार आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे 4 दिवसांपूर्वीच अशाच एका ड्रोनने आंतरवालीवर घिरट्या घातल्या होत्या.
तत्पूर्वी, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जायकडवाडी धरण परिसरातही ड्रोन संशयास्पदरित्या फिरताना आढळले होते. जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी हे गावही याच धरणाच्या पट्ट्यात येते. त्यामुळे जायकवाडी परिसरात फिरणारे ड्रोन व आंतरवाली सराटीत आढळलेले ड्रोन एकच आहे का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाशी संबंधित सगेसोयरे अधिसूचनेची तत्काळ अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. त्यासाठी त्यांनी सरकारला 13 जुलैपर्यंतची मुदत दिली आहे. सरकारने या मुदतीत या प्रकरणी योग्य तो निर्णय घेतला नाही, तर जरांगे आपल्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवणार आहेत. त्यांनी यापूर्वीच विधानसभा निवडणुकीत आपले उमेदवार उभे करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे सरकार पुढील काही दिवसांत या प्रकरणी एखादा ठोस निर्णय घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.