ध्यास विश्वसार्ह बातमीचा

हृदयद्रावक : दरड कोसळली, २ बस नदीत वाहून गेल्या; ६० प्रवासी बेपत्ता

नवी दिल्ली : वृत्तसंस्था

नेपाळमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील मदन आश्रित महामार्गावर दरड कोसळल्याने प्रवाशांनी भरलेल्या दोन बस महामार्गालगत वाहणाऱ्या त्रिशूल नदीत पडल्या आहेत. बस नदीत पडल्यानंतर नदीच्या जोरदार प्रवाहामुळे दोन्ही बस वाहून गेल्याचे बोलले जात आहे. या घटनेत 60 हून अधिक प्रवासीही बेपत्ता आहेत. त्यांच्या शोधासाठी सध्या बचावकार्य सुरू आहे.

घटनेची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसही बचाव पथकाला मदत करत आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ही बस राजधानी काठमांडूला जात होती. एंजल आणि गणपती डिलक्स बस अशी या दोन बसची नावे होती. दरड कोसळल्याने या बसेसला धडक बसून हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या बसमधून प्रवास करणाऱ्या काही प्रवाशांकडून त्यांना या अपघाताची माहिती मिळाली. बस नदीत पडल्यानंतर या प्रवाशांनी पोहून आपला जीव वाचवला आणि नंतर पोलिसांना घटनेची माहिती दिली.

या सगळ्या दरम्यान नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहल यांनी या अपघातावर शोक व्यक्त केला आहे. ते म्हणाले की नारायणगड-मुग्लिन मार्गावरील भूस्खलनात बस वाहून गेल्याने सुमारे पाच डझन प्रवासी बेपत्ता झाल्याच्या बातम्यांमुळे आणि देशाच्या विविध भागात पूर आणि भूस्खलनामुळे मालमत्तेचे नुकसान झाल्याच्या वृत्तामुळे मला खूप दुःख झाले आहे. मी गृह प्रशासनासह सरकारच्या सर्व एजन्सींना प्रवाशांचा शोध आणि प्रभावीपणे सुटका करण्याचे निर्देश देतो.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!