ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आता महिलांना घरातूनच ई-एफआयआर करता येणार दाखल ; पंतप्रधान मोदी

जळगाव : वृत्तसंस्था

महिलांवरील अत्याचार कदापि खपवून घेणार नाही. महिलांच्या सुरक्षेसाठी करत असलेल्या उपाययोजनांबद्दल केंद्र सरकार राज्य सरकारच्या पाठीशी ठामपणे उभे राहील, असे स्पष्ट करतानाच महिलांच्या रक्षणासाठी कायदे कठोर केले जात आहेत. एफआयआर दाखल करण्यासाठी लागणारा वेळ लक्षात घेता आता महिलांना घरातूनच ई-एफआयआर दाखल करता येईल, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी आश्वस्त केले.

जळगाव येथे मोदी यांच्या उपस्थितीत लखपती दीदी सन्मान सोहळा झाला, त्यावेळी ते बोलत होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते. न्यायसंहितेच्या माध्यमातून सरकारने कडक कायदे केले आहेत. यापुढे जलद प्रतिसाद मिळेल. अशा प्रकरणात फाशी आणि जन्मठेपेची शिक्षा दिली जात आहे. लग्नाच्या नावे फसवणूक होत होती, त्याबाबत कायदा केला आहे, याकडे मोदी यांनी लक्ष वेधले.

महिलांवरील अत्याचार हा अक्षम्य अपराध आहे. तो करणारा तसेच त्याला पाठीशी घालणारा कोणीही सुटता कामा नये, ही सरकारची भूमिका आहे. कोणत्याही स्तरावर कारवाई करताना आरोपीबाबत बेजबाबदारपणा दाखविणार्‍यांना त्यांची जागा दाखविली जाईल, असा इशारा मोदी यांनी दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, महिला अत्याचारात दोषी कुणीही असो, त्याला शिक्षा झालीच पाहिजे. तसेच संबंधिताला मदत करणारेही शिक्षेपासून वाचता कामा नयेत. रुग्णालय असो, शाळा, कार्यालय किंवा पोलिस व्यवस्थेतील कोणीही कोणत्याही स्तरावर कारवाई करताना बेजबाबदारपणा दाखवत असेल तर त्यांच्यावरही कडक कारवाई व्हायला हवी. सरकारे येतील अन् जातील; पण नारीशक्तीकडे लक्ष दिले पाहिजे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!