---Advertisement---

ठाकरेंची पोस्ट व्हायरल : शेतकरी देखील सरकारचा लाडका आहे ?

By team
On: September 4, 2024 4:50 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील सरकारने गेल्या महिन्यात महिलांसाठी लाडकी बहिण योजना सुरु केली होती. त्यानंतर अनेक विरोधकाकडून सरकारवर हल्लाबोल देखील झाला होता. तर सध्या राज्यातील अनेक जिल्ह्यात मुसळधार पाऊस बरसत असतांना मराठवाड्यामध्ये पावसामुळे शेत पीकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी आहे. मात्र, ही मागणी करतानाच त्यांनी राज्य सरकारवर खोचक शब्दात टीकाही केली आहे. शेतकरी देखील सरकारचा लाडका आहे, हे सरकारने दाखवून द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

शेतकऱ्यांना मदत करताना सरकारने मदतीचा हात अजिबात आखडता घेऊ नये. सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसंग आहे, लक्षात घ्यावे. तसेच प्रशासनाला कामाला लावून गणपती सणाच्या काळातच नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे. या संदर्भात राज ठाकरे यांनी एका पोस्टच्या माध्यमातून राज्य सरकारवर खोचक शब्दात टीका केली आहे.

राज ठाकरे यांनी केलेली पोस्ट देखील पहा….

सस्नेह जय महाराष्ट्र,
गेल्या काही दिवसांत मराठवाड्यात झालेल्या पावसाने, तिथल्या अनेक जिल्ह्यांमध्ये शेतीचं अमाप नुकसान झालं आहे. कित्येक पिकं अगदी काढणीला आलेली असताना वाहून गेली आहेत. डोळ्यासमोर उभं झालेलं पीक नष्ट होणं आणि ते देखील सणासुदीच्या तोंडावर, हे सहन करणं कठीण आहे. राज्यसरकारने तातडीने या नुकसानीचे पंचनामे करून, जितक्या लवकर नुकसान भरपाईची रक्कम देता येईल ते पहावं. शेतकरी पण लाडका आहे हे दाखवून द्यावं.
तसंच मराठवाड्यातील महाराष्ट्र सैनिकांनी देखील प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे झटपट होत आहेत ना, नसल्यास ते करायला लावून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळेल हे पहावं. यात अजून एक गोष्ट म्हणजे पावसाच्या पाण्याने जमीन ओली झालेली असते, आणि ती सुकायला वेळ लागतो, यामुळे लहान मुलांपासून ते म्हाताऱ्या माणसांपर्यंत सर्वच जण आजारी पडतात. त्यामुळे ज्या घरांत पाणी शिरलं आहे अशा ठिकाणी प्लॅस्टिकच्या शीट्स पोहचतील किंवा जुने फ्लेक्स तरी पोहचतील हे बघावे ! किमान त्या निमित्ताने तरी पुढारी जनतेच्या घरात पोहोचतील आणि आजपर्यंत आपलं वाटोळ कोणी केलं तेही जनतेला समजेल !
या सगळ्यात सरकारने पण मदतीचा हात आखडता अजिबात घेऊ नये, आणि सणासुदीच्या सुट्ट्या असल्या तरी हा कठीण प्रसांग आहे हे लक्षात घेऊन, प्रशासनाला कामाला लावून नुकसान भरपाई गणपतीच्या सणाच्या काळात मिळेल हे पहावं.
राज ठाकरे

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!