मुंबई : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वीच मुंबई विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीमध्ये आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वातील युवा सेना आणि भाजपप्रणीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत (एबीव्हीपी) थेट लढत झाली. २७ सप्टेंबर रोजी मतमोजणी झाली. त्यात दहापैकी १० जागांवर युवा सेनेच्या उमेदवारांनी दणदणीत विजय मिळवला. दहावा उमेदवारही विजयाच्या मार्गावर होता. या निवडणुकीत मनसे आणि शिंदेसेनेने तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती.
युवा सेनेने पहिल्यांदा २०१० मध्ये सिनेटची निवडणूक लढवली होती, ज्यामध्ये १० पैकी ८, तर त्यानंतर २०१८ मध्ये १० पैकी १० जागा भरघोस मताने निवडून आल्या होत्या. गेल्या १४ वर्षांपासून मुंबई विद्यापीठावर युवा सेनेचे राज्य आहे. युवा सेनेचे नेते वरुण सरदेसाई यांनी या विजयाबद्दल आनंद व्यक्त केला. उद्धवसेना हीच असली शिवसेना असल्याचे दाखवून दिल्याचे ते म्हणाले. या निवडणुकीचा फायदा विधानसभेला होईल, असा दावाही युवा सेना पदाधिकाऱ्यांनी केला.
राखीव मतदारसंघ : डीटीएनटी : विजयी – शशिकांत झोरे ५१७०, अजिंक्य जाधव १०६६,
अनुसूचित जाती : शीतल देवरूखकर ५४९८, राजेंद्र सयगावकर १०१४,
अनुसूचित जमाती : धनराज कोहचाडे ५२४७, निशा सावरा ९२४,
ओबीसी : मयूर पांचाळ ५३५०, राजेश भुजबळ ८८८,
महिला राखीव : स्नेहा गवळी ५०१४, रेणुका ठाकूर ८८३,
खुला गट : प्रदीप सावंत १३३८, मिलिंद साटम १२४६
मुंबई विद्यापीठाच्या कारभारावर थेट ताबा मिळवण्यासाठी सिनेट (अधिसभा) हा प्रभावी मंच आहे. या मंचावर गेल्या १४ वर्षांपासून असलेला ताबा कायम ठेवण्यासाठी युवा सेनेचा पाठपुरावा सुरू होता. मात्र, भाजपचे मुंबईतील काही नेते त्याला विरोध करत होते. युवा सेना समर्थक मतदारांना मतदार यादीतून वगळण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो न्यायालयाच्या हस्तक्षेपामुळे अपयशी ठरल्याने २४ सप्टेंबरला मतदान झाले.