नवी दिल्ली : मोदी सरकारच्या नव्या कृषी कायद्याविरोधात गेल्या अनेक दिवसांपासून दिल्ली हरयाणा (सिघू) सीमेवर शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात सहभागी झालेल्या संत बाबा राम सिंह यांनी बुधवारी गोळी झाडून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला. संत बाबा राम सिंह हे ६५ वर्षांचे होते. ते करनालमधील रहिवासी होती. त्यांची आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठी देखील सापडली. यात बाबा राम सिंह यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख केला आहे.
सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करत असल्याचंही त्यांनी आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलं आहे. हरयाणा आणि पंजाबबरोबरच जगभरामध्ये बाबा राम सिंह यांचे लाखो अनुयायी आहेत. त्यांनी अनेक शीख संघटनांची महत्वाची पदं भूषवली आहेत.
आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीचा मराठी अनुवाद
आपल्या हक्कासाठी शेतकऱ्यांचे दु:ख मी पाहिले आहे
त्यांना रस्त्यावर पाहून मला दु:ख झाले आहे
सरकार त्यांना न्याय देत नाही
हा एक गुन्हा आहे
जो गुन्हा करतो तो पापी आहे
अन्याय सहन करणे हे देखील पाप आहे
कोणी शेतकऱ्यांच्या हक्कासाठी, तर कोणी अन्यायाविरोधात काही केले आहे
कोणी पुरस्कार परत करून आपला राग व्यक्त केला आहे
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी , सरकारी अन्यायाविरोधातील क्रोध येऊन सेवक आत्महत्या करत आहे
हा अन्यायाविरोधात आवाज आहे
हा शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आवाज आहे
‘वाहे गुरुजी का खालसा, वाहे गुरुजी की फतेह’