पुणे वृत्तसंस्था
दोन एसटी बसची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाल्याची घटना पुणे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर पाटस आणि वरवंडच्या शिवेवर असलेल्या निसर्ग हॉटेल जवळ घडली. या अपघातामध्ये एक महिला व एक जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. तर दोन्ही बसमधील ४० ते ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. ही माहिती पाटस पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली. सुवर्णा संतोष होले (वय ३८, रा. बिरोबावाडी ता. दौंड जि. पुणे ) व नामदेव आढाव ( वय ७०, रा. काष्टी, ता. श्रीगोंदा जि. नगर ) दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर राज्य परिवहन विभागाची जामखेड ते स्वारगेट एसटी बस ही पुणे दिशेला जात असताना एक मोटर सायकल आडवी आल्याने एसटी बस वाहन चालकाने मोटर सायकल चालकाला वाचवण्यासाठी वाहन बाजूला घेत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने एसटी बस दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला गेली आणि समोरील येणाऱ्या पुणे वरून तुळजापूरला जाणाऱ्या दुसऱ्या एसटी बसला जाऊन धडकली. हा अपघात सोमवारी (दि २८) दुपारी एक ते दीड वाजेच्या सुमारास पाटस आणि वरवंड शिवेवर जवळ कवठीचा मळा हॉटेल निसर्ग समोर घडला.
या अपघातामध्ये मोटर सायकल चालक वाचला. मात्र दोन्ही एसटी बसमधील तब्बल ४० ते ४५ प्रवासी जखमी झाले आहेत. जखमी झालेल्या प्रवाशांना वरवंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्र , चौफुला व दौंड येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान सुवर्णा होले व नामदेव आढाव या दोघांचा मृत्यू झाला.या घटनेची माहिती मिळताच पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक भानुदास बंडगर आणि कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमी प्रवाशांना ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढून उपचारासाठी रुग्णालय दाखल करण्यात आले. दरम्यान, या अपघातात दोन्ही एसटी बस समोर समोर धडकल्याने दोन्ही वाहनांची चेंदामेंदा झाल्याने मोठे नुकसान झाले आहे .