---Advertisement---

राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

By team
On: December 27, 2024 5:27 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई, वृत्तसंस्था 

 

भारतीय हवामान खात्याने संपूर्ण राज्यात पावसाचा इशारा दिला आहे.  असून आज आणि उद्या विदर्भ आणि मराठवाड्याला पावसाचा ‘येलो अलर्ट’ दिला आहे. मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी आज वादळी वाऱ्यासह गारपिटीचा ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या या अंदाजामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र चिंता वाढली आहे.

पश्चिम मध्य बंगालच्या उपसागरात उत्तर तामीळनाडू, दक्षिण आंध्रप्रदेशच्या किनाऱ्यालगत ठळक कमी दाब क्षेत्र पश्चिमेकडे सरकत हळूहळू निवळत आहे. पश्चिमी चक्रावात, राजस्थान आणि परिसरावर असलेले चक्राकार वारे तसेच अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून होणारा बाष्पाचा पुरवठा यामुळे महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाला पोषक हवामान झाले आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात शुक्रवार ते शनिवारदरम्यान गारपीट आणि मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. आज दूपारनंतर सर्वत्र पावसाला सुरुवात होईल. नंदूरबार, धुळे, जळगाव, अहिल्यानगर या जिल्ह्यासह मराठवाडा, पुणे आणि नाशिक जिल्ह्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तर उद्या धुळे, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाळासह व वादळी वाऱ्यांसह गारपीट होण्याची शक्यता आहे. आज रात्रीपर्यंत पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यात वादळी पावसाची हजेरी लागण्याची शक्यता आहे.

प्रामुख्याने बुलढाणा, अकोला, वाशीम, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, हिंगोली आणि बीड जिल्ह्यांचा समावेश आहे. याठिकाणी काही प्रमाणात गारपिटीची शक्यता देखील वर्तविण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या उर्वरित जिल्ह्यांतील काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता देखील आहे. शनिवारी पाऊस विदर्भातील इतर जिल्ह्यांत हजेरी लावेल. यात यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, आणि चंद्रपूर जिल्ह्यांचा समावेश आहे. या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचीही शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. पश्चिम विदर्भ आणि शेजारच्या मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसाची स्थिती या दिवशीदेखील कायम राहण्याची शक्यता आहे.

यादिवशी एकंदरित विदर्भात आणि मराठवाड्यात आभाळी हवामान अपेक्षित असल्यामुळे कमाल तापमानात थोडी घट होईल. मात्र खानदेश आणि मध्य महाराष्ट्रात हवामान स्थिर होण्यास सुरुवात होईल. रविवारी विदर्भ आणि मराठवाड्यातील काही तुरळक ठिकाण वगळता राज्यातील बहुतांश भागांत स्थिर हवामान पहायला मिळेल आणि सोमवारपासून मात्र थंडीत वाढ होईल. शेतकऱ्यांनी हवामानाच्या या स्थितीनुसार नियोजन करावे, असे आवाहन हवामान खात्याने केले आहे. पाऊस, गारपीट आणि वाऱ्यापासून पीके सुरक्षित ठिकाणी ठेवावीत, असे आवाहन कृषी विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!