शिर्डी : वृत्तसंस्था
नववर्षाच्या सुरुवातीस अनेक भाविक आपल्या श्रद्धास्थानी दर्शन घेत असतांना तर देशभरातील लाखो भाविकांनी शिर्डी येथे साईबाबांच्या चरणी तल्लीन झाले होते तर साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाच्या स्वागतानिमित्त आयोजित शिर्डी महोत्सवाच्या २५ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या कालावधीत सुमारे ८ लाखांहून अधिक साईभक्तांनी श्रीसाईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. या कालावधीत सुमारे १६.६१ कोटी रुपये देणगी साईबाबांच्या झोळीत जमा झाली आहे. मागील वर्षी १० दिवसांत १५ कोटी ९५ लाखांची देणगी साईंच्या झोळीत जमा झाली होती. यंदा त्यात १ कोटी ६६ लाखांची वाढ झाली आहे.
नाताळ सुट्टी, चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षानिमित्त २५ डिसेंबर २०२४ ते २ जानेवारी २०२५ या काळात दानपेटीत ६ कोटी १२ लाख ९१ हजार ८७५ रुपये जमा झाले. देणगी काउंटरद्वारे ३ कोटी २२ लाख २७ हजार ५०८ रुपये, पीआरओ सशुल्क पासद्वारे १ कोटी ९६ लाख ४४ हजार २०० रुपये, डेबिट-क्रेडिट कार्ड, ऑनलाइन देणगी, चेक/डीडी व मनी ऑर्डरद्वारे ४ कोटी ६५ लाख ७३ हजार ६९८ रुपये अशी एकूण १५ कोटी ९७ लाख ३७ हजार २८१ रुपये देणगी रोख स्वरूपात प्राप्त झाली आहे. तसेच सोने ८०९.२२० ग्रॅम (५४ लाख ४९ हजार ६८६ रुपये) व चांदी १४ किलो ३९८ ग्रॅम (९ लाख ९३ हजार ८९५ रुपये) देणगी प्राप्त झालेली आहे. अशा प्रकारे विविध माध्यमातून एकूण १६ कोटी ६१ लाख ८० हजार ८६२ रुपये देणगी संस्थानला प्राप्त झाली आहे.
श्रीसाई प्रसादालयात ६ लाखांहून अधिक साईभक्तांनी मोफत प्रसाद भोजनाचा लाभ घेतला. सुमारे १ लाख ३५ हजारांहून अधिक साईभक्तांनी अन्न पाकिटांचा लाभ घेतला. याबरोबरच ९ लाख ४७ हजार ७५० लाडू प्रसाद पाकिटांची विक्री करण्यात आली असून याद्वारे १ कोटी ८९ लाख ५५ हजार प्राप्त झालेले आहेत. याबरोबरच ५ लाख ९८ हजार ६०० साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकिटांचा लाभ घेतला. नाताळ आणि नवीन वर्षानिमित्त ९ दिवसांत शिर्डीत ८ लाख भाविकांनी घेतले दर्शन घेतले. विशेष म्हणजे देशासोबत परदेशातूनही भाविक मोठ्या संख्येने शिर्डीत दाखल झाले होते. बॉलीवूड कलाकार आणि अनेक राजकीय नेत्यांनीही शिर्डीत हजेरी लावली.