ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिंदेंनी आता महाकुंभमेळ्यात नागा साधूंबरोबर बसायला पाहिजे ; संजय राऊत !

मुंबई : वृत्तसंस्था

गेल्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठा फटका बसला आहे तर महायुतीला मोठे यश आले आहे. मात्र महायुतीतील शिंदेंच्या शिवसेनेच्या मंत्र्यांना कमी पालकमंत्री पद मिळाल्याने नाराज असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा एकदा ठाकरे गटाच्या निशाण्यावर आले आहे. ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी पुन्हा एकदा त्यांच्या तोफ डागली आहे.

एकनाथ शिंदे हे पुन्हा एकदा आपल्या मूळ गावी दरे येथे गेले आहेत. शनिवारी पालकमंत्रिपदाची यादी जाहीर झाली, मात्र या यादीमध्ये मंत्री दादा भुसे आणि भरत गोगावले यांना स्थान मिळू शकलेलं नाहीये. परंतु दादा भुसे आणि भरत गोगावले यांना पालकमंत्रिपद देण्यात यावं अशी एकनाथ शिंदे यांची इच्छा होती, मात्र भरत गोगावले आणि दादा भुसे यांना पालकमंत्रिपद न मिळाल्यानं शिंदे नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली. त्यामुळे ते पुन्हा दरे गावी गेले आहेत, अशी चर्चा आहे. आता याच मुद्यावरून शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासादर संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेवर टीका करत त्यांना टोला लगावला आहे. ” आमचे एक डेप्युटी सीएम आहेत ठाण्याचे त्यांना राग येतो आणि ते गावाला जाऊन बसतात. पहाटे जातात, दुपारी जातात, दिवसा जातात. त्यांच्या गावात जाऊन बसतात. सरकार कुणी चालवायचं मग?” असा सवाल राऊतांनी विचारला.

” एकनाथ शिंदे हा कायम अस्वस्थ आत्मा आहे. त्याने खरं म्हणजे महाकुंभमेळ्यात जाऊन बसायला पाहिजे होतं नागा साधूंबरोबर. नागा साधूही अस्वस्थ असतो फार. अघोरी विद्या करतात, नाचतात आपल्या तंबूत बसतात. जे अस्वस्थ आहेत महाराष्ट्रात आहेत या क्षणी, त्यांच्यासाठी योगी आदित्यराज जींनी प्रयागराजमध्ये काही तंबू आणि साधूंची व्यवस्था केली आहे. अस्वस्थ आत्म्यांनी तिकडे जायचं. अस्वस्थ आहात तर महाराष्ट्राला का त्रास देता. तुमच्या अस्वस्थपणामुळे महाराष्ट्राला त्रास देऊ नका. तुमची ही राजकीय अस्वस्थता महाराष्ट्राच्या मुळावर , लोकांच्या मुळावर येतेय. जितके दिवस कुंभ आहे, तितके दिवस अस्वस्थ मंत्री आणि पदाधिकाऱ्यांनी कुंभमेळ्यात जाऊन शांतपणे ध्यानधारणा करावी” असा खोचक सल्ला ही राऊत यांनी एकनाथ शिंदेंना दिला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!