प्रयागराज : वृत्तसंस्था
देशातील प्रयागराज येथे सुरु असलेल्या महाकुंभमेळ्यात कोट्यावधी भाविकांनी सहभाग नोंदविला आहे तर आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा महाकुंभमेळ्यात सुमारे साडेसात तास सहभागी होणार आहेत. त्यांच्यासोबत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ उपस्थित राहतील. सकाळी साडेअकराच्या सुमारास बामरौली विमानतळावर शहा यांचे आगमन होणार आहे. तेथून निषादराज क्रूझने व्हीआयपी घाटावर येतील.
गृहमंत्री अमित शहा संगमात स्नान करतील. त्यानंतर पूजा करून अक्षयवट आणि बडे हनुमान मंदिराला भेट देतील. यानंतर ते सर्व शंकराचार्यांची भेट घेणार आहेत. तसेच शरणानंदजी महाराज, गोविंद गिरी महाराज आणि इतर संतांना भेटतील. ते जगन्नाथ ट्रस्ट कॅम्पमध्ये संतांसोबत जेवण करणार आहेत. त्यानंतर संध्याकाळी ६:५० वाजता बामरौली विमानतळावरून दिल्लीला रवाना होतील.
आज महाकुंभाचा १५ वा दिवस आहे. दोन दिवसांनी, मौनी अमावस्येला दुसरे अमृत स्नान आहे, त्यामुळे मेळ्यात भाविकांची संख्या झपाट्याने वाढत आहे. रविवारी १.७४ कोटींहून अधिक भाविकांनी संगमात पवित्र स्नान केले. आतापर्यंत १३.२१ कोटींहून अधिक भाविकांनी पवित्र स्नान केले आहे.