मुंबई : वृत्तसंस्था
बीड येथील सरपंच संतोष देशमुख प्रकरण आता जोरदार चर्चेत आले असतांना त्यांनतर राज्यभरात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले. या घटनेवरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे, संशयित वाल्मीक कराड आणि त्याचे सहकारी यांच्या विरोधात अनेक पुरावे सादर केले. दरम्यान त्यांनी अनेक खळबळजनक दावे देखील केले. तसेच वारंवार धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली, परंतु, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अद्याप कोणतेही पाऊल उचललेले नाही. यावर अंजली दमानिया यांनी पुराव्यांसह अजित पवार यांना भेटणार असल्याची माहिती एक्स पोस्टवरून दिली आहे.
अंजली दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, “अजित पवार आणि माझा ३६ चा आकडा आहे, त्यांच्या भ्रष्टाचारा विरुद्ध मी सातत्याने लढत आहे आणि मरेपर्यंत लढत राहीन. पण बीडचे जे कृत्य केले गेले ते माणुसकीला काळिमा फासणारे आहे. अशा हैवाण लोकांना थरा देणाऱ्या आणि मोठं करणाऱ्या मंत्र्याचा (धनंजय मुंडेंचा) ताबडतोब राजीनामा घ्यायला हवा होता. पण अजित पवारांना पुरावे हवे आहेत ना? तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्या, ही मागणी करण्यासाठी मी अजित पवारांना भेटण्याची वेळ मागितली आहे”.
पुढे दमानिया यांनी “वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत. या दोघांचे व्यवहार कसे एकत्र आहेत. धनंजय मुंडे आणि राजश्री मुंडे हे Mahagencoशी कसे व्यवहार करत आहेत, हे पुरावे दाखवण्यासाठी मी वेळ मागितली आहे. हे Office of Profit आहे आणि मंत्रिपद काय आमदारकी रद्द झाली पाहिजे, बघू कधी वेळ देतात…?”, असेही त्या म्हणाल्या आहेत.