मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार आल्यानंतर अनेक मोठ मोठे निर्णय घेण्यात येत अताना नुकतेच आता राज्याचे शिक्षणमंत्री असताना दीपक केसरकर यांनी काही महत्त्वाचे निर्णय घेतले होते. एक राज्य एक गणवेश आणि पुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा निर्णय त्यांनी शिक्षणमंत्री असताना घेतला होता. मात्र, हा निर्णय आता सरकारकडून रद्द करण्यात आला आहे. राज्यात महायुतीचे सरकार पुन्हा स्थापन झाल्यानंतर दीपक केसरकर यांना शिक्षणमंत्री पद मिळाले नाही. दादा भुसे यांच्याकडे शिक्षणमंत्री पद गेले आहे.
सन 2024 – 25 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दुसरी ते आठवी या वर्गासाठी असलेल्या पाठ्यपुस्तकांना वह्यांची पाने लावण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला होता. मात्र, यंदाच्या वर्षापासून तो निर्णय मागे घेण्यात आल्याने आता विद्यार्थ्यांना वह्याच्या पानांशिवाय पुस्तके मिळणार आहेत.
दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना घेण्यात आलेल्या या निर्णयावर शालेय शिक्षण विभागाकडून आढावा घेण्यात आला. यात पाठ्यपुस्तकांमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या वह्यांच्या कोऱ्या पानांचा विद्यार्थ्यांकडून शिकविलेल्या घटकांच्या नोंदी घेण्यासाठी अपेक्षेप्रमाणे उपयोग झाल्याचे दिसून आले नाही. तसेच सदर योजनेचा उद्देश हा दप्तराचे ओझे कमी करणे असा होता, परंतु विद्यार्थी पुस्तके व सोबत वह्या देखील घेऊन येत असल्याचे तसेच पाठ्यपुस्तकांमधील कोऱ्या पानांचा शैक्षणिक नोंदी घेण्याकरिता वापर होत नसल्याचे आढळून आले आहे.
तसेच दीपक केसरकर शिक्षणमंत्री असताना एक राज्य एक गणवेश हा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या योजनेत सुसूत्रतेअभावी योजना फसल्याचे सांगत या योजनेतही बदल करण्यात आले असून मोफत गणवेश योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीकडे देण्यात येणार आहे. त्यामुळे, थेट लाभार्थी योजनेअंतर्गत शाळा समितीकडे निधी दिला जाणार असून विद्यार्थ्यांना शैक्षणिक सत्र सुरू होताच योग्य मापाचे गणवेश मिळणार आहेत.