मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मुंबईकरांचे अराध्य दैवत असलेल्या प्रभादेवीच्या सिध्दिविनायक मंदिरात दर्शनाला जाताना मंदिर न्यासाकडून भक्तांसाठी ड्रेस कोड लागू केला आहे. भारतीय परंपरेला शोभेल असे कपडे परिधान करावे, फाटकी जीन्स, स्कर्ट, अशोभनीय कपडे घालू नयेत. भाविकांनी अंगभर कपडे घालावेत, हे नियम सर्वांना बंधनकारक करण्यात आले आहेत. ड्रेस कोडचे उल्लंघन झाले तर मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही, असे स्पष्ट आदेशही देण्यात आले आहेत.
माघी गणेश जयंतीच्या निमित्ताने सिद्धिविनायक मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर ट्रस्टच्या सदस्यांची बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यानंतर न्यासाकडून मंगळवारी माघी गणेशोत्सवाची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. यावेळी हा ड्रेसकोडचा निर्णयही जाहीर करण्यात आला. यावेळी न्यासाचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी, सदस्य भास्कर शेट्टी, मनीषा तुपे, भास्कर विचारे, राहुल लोंढे यांच्यासह सदस्य उपस्थित होते. गणेशभक्तांनी दर्शनाला सिद्धिविनायक मंदिरात इतर नागरिकांना संकोच वाटणार नाही असे भारतीय परंपरेला शोभेल असे कपडे परिधान करावे, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी आता भारतीय पारंपरिक वेषात, अंगभर कपडे घालून मंदिरात येणे आवश्यक असणार आहे. शालिनता जपणारे व मंदिराचे पावित्र्य राखले जाईल या कपड्यांमध्ये मंदिरात प्रवेश दिला जाईल. जे पुरुष किंवा महिला भाविक शॉर्ट्स कपड्यांमध्ये सिद्धिविनायक मंदिरात येतात त्यांना आता प्रवेश बंदी करण्यात येणार असल्याचे न्यास व्यवस्थापन स्पष्ट केले आहे. फाटकी जीन्स, स्कर्ट तसेच अंगप्रदर्शन करणारे कपडे असू नयेत असे उल्लेख असलेले परिपत्रकही जारी केले.