पुणे : वृत्तसंस्था
जगभरात २०१९ मध्ये कोरोणाच्या आजाराचा हाहाकार सुरु झाला होता यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला असतांना आता राज्यात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) या आजाराने तोंडवर काढले आहे. पुणे, पिंपरी चिंचवड आणि महाराष्ट्रातील इतर भागात गुइलेन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या 140 वर पोहोचली आहे. यापैकी 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. 29 जानेवारी रोजी 3 प्रकरणे नोंदवली गेली. शुक्रवारी आणखी एका व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 4 वर पोहोचली आहे.
30 जानेवारी रोजी जारी केलेल्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार, सिंहगड रोडवरील धायरी येथील रहिवासी असलेल्या 60 वर्षीय पुरुषाचा शुक्रवारी राज्यात जीबी सिंड्रोममुळे मृत्यू झाला. यापूर्वी पिंपळे गुरव येथे 36 वर्षीय पुरूष, पुण्यात 56 वर्षीय महिला आणि सोलापूरमध्ये 40 वर्षीय पुरूषाचा मृत्यू झाला होता. अधिकाऱ्यांच्या मते, 140 रुग्णांपैकी 26 रुग्ण पुणे महानगरपालिकेतील आहेत. महामंडळात समाविष्ट झालेल्या गावांमधील 78 रुग्ण आहेत. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील 15 रुग्ण आहेत.
पुणे ग्रामीणमधील 10 आणि इतर जिल्ह्यांतील 11 रुग्ण आहेत. तेलंगणामध्येही पहिला रुग्ण आढळला आहे. सिद्दीपेट जिल्ह्यात एका 25 वर्षीय महिलेला दाखल करण्यात आले आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी पुण्यात जिल्हा नियोजन समितीची बैठक घेतली. रुग्णांकडून जास्त शुल्क आकारणाऱ्या खासगी रुग्णालयांवर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिले. अजित पवार हे पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री देखील आहेत.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी GBS रुग्णांवर मोफत उपचार करण्याची घोषणा केली. पिंपरी-चिंचवडमधील लोकांवर व्हीसीएम हॉस्पिटलमध्ये, तर पुणे महापालिका क्षेत्रातील रुग्णांवर कमला नेहरू हॉस्पिटलमध्ये उपचार केले जातील, असे ते म्हणाले. ग्रामीण भागातील नागरिकांना पुण्यातील ससून रुग्णालयात मोफत उपचार मिळणार आहेत.