अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अखेर कुरनूर धरणातून बुधवारी म्हणजे ५ फेब्रुवारी रोजी दुपारी ३ वाजता पाणी सोडण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. यासंदर्भात शेतकऱ्यांनी सतर्क राहावे, असे आवाहन महसूल व पाटबंधारे विभागाने केले आहे. धरणामध्ये सध्या ८४ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.या पार्श्वभूमीवर पंधरा दिवसांपूर्वी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या उपस्थितीमध्ये कालवा सल्लागार समितीची बैठक झाली होती.
या बैठकीमध्ये बंधारे दुरुस्त करून पाणी सोडण्याची मागणी करण्यात आली होती. हे कालवे जलसंधारण व पाटबंधारे विभागाने लक्ष देऊन तातडीने दुरुस्त करावेत, अशी सूचना त्यांनी केली होती. त्यामुळे पाणी सोडण्याचा निर्णय आठ दिवस लांबणीवर गेला होता.अखेर याची दुरुस्ती आता पूर्ण झालेली आहे, अशी माहिती पाटबंधारे विभागाचे उपविभागीय अधिकारी प्रकाश
बाबा यांनी दिली. बोरी नदीकाठच्या शेतकऱ्यांनी विशेषता याबाबतीत सतर्क राहावे. याबाबतीत आम्ही तहसील कार्यालयाला देखील कळविले आहे. रब्बी हंगामासाठी व बोरी नदीकाठच्या गावांना पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार आहे. पाणी सोडण्याचा आणखीन एक टप्पा होणार आहे.पहिल्या टप्प्याचे हे पाणी आहे. त्यामुळे सुरुवातीपासूनच शेतकऱ्यांनी पाणी काटकसरीने वापरावे, असे आवाहन देखील पाटबंधारे विभागाने केले आहे.