ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मोठा निर्णय : शिर्डी संस्थानातील कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळेत बदल !

शिर्डी : वृत्तसंस्था

शिर्डीतील साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांची हत्या झाल्यानंतर आता संस्थानच्या वतीने काही महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. त्यानुसार कर्मचाऱ्यांच्या कामाची वेळ बदलण्यात आली आहे. कर्मचाऱ्यांना सकाळी चार ऐवजी आता सकाळी सहा वाजता कामावर यावे लागणार आहे. त्याचबरोबर या हत्याकांडात मयत झालेल्या कर्मचाऱ्यांना विमा पॉलिसीच्या सर्व सुविधा मिळवून देण्यासाठी साई संस्थानच्या वतीने प्रयत्न केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. संस्थानच्या वतीने घेण्यात आलेल्या वेळापत्रक बाबतच्या या निर्णयाची अंमलबजावणी ही आजपासूनच होणार आहे.

शिर्डीच्या साई संस्थानच्या 2 कर्मचाऱ्यांची चाकूने भोसकून निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. सोमवारी पहाटे दोन वेगवेगळ्या ठिकाणी या घटना घडल्या. या घटनेत अन्य एक तरुण गंभीर जखमी झाला आहे. या हत्याकांडामुळे शिर्डी चांगलीच हादरली होती. या संदर्भात साई संस्थानच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे.

सुभाष साहेबराव घोडे व नितीन कृष्णा शेजुळ अशी मृत कर्मचाऱ्यांची नावे आहेत. तर कृष्णा देहरकर असे गंभीर जखमी तरुणाचे नाव आहे. कृष्णावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृत कर्मचारी व जखमी तरुण सोमवारी पहाटे साई संस्थानच्या आपल्या नोकरीवर येत होते. पण रस्त्यातच त्यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. त्यात सुभाष व नितीन हे दोघेही जागीच ठार झाले. या दोघांवर तासाभराच्या अंतराने हल्ला करण्यात आला.

हा हल्ला कशामुळे झाला? हे स्पष्ट झाले नाही. पण या घटनेमुळे अवघी शिर्डी हादरली आहे. या घटनेची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी पोलिसांना त्याची माहिती कळवली. पण पोलिसांनी तासभर विलंबाने घटनास्थळ गाठल्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. इथे कुणीही कुणासाठी लगबगीने येत नाही, असा आरोप मृत तरुणाच्या कुटुंबीयांनी केला. या हत्येला अपघाताचे स्वरुप देण्यात येत असल्याचा आरोपही या प्रकरणी केला जात आहे. मृत सुभाष घोडे हे शिर्डीच्या करडोबा नगर चौकात राहत होते. त्यांच्यावर घरापासून काही अंतरावरच हल्ला करण्यात आला. तर नितीन शेजुळ व कृष्णा देहरकर यांच्यावर श्रीकृष्ण नगर भागात हल्ला झाला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!