मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांविषयी चुकीचे वक्तव्यावरुन वातावरण तापण्यास सुरुवात झाली असतांना आता अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी त्याबद्दल माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा माझा हेतू नव्हता. तसा विचारसुद्धा माझ्या मनात कधीही येणार नाही, असे त्यांनी सांगितले. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असे विधान राहुल राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये केले होते. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी आणि राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीका केली होती.
राहुल सोलापूरकर यांनी यासंदर्भात एक व्हिडीओ प्रसिद्ध करत माफी मागितली आहे. त्यांनी प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओमध्ये राहुल सोलापूरकर यांनी,”दीड दोन महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली. त्या दरम्यान, इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल वक्तव्य केलं होतं. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी वक्तव्य केलं. तसा संदर्भ काही इतिहासकारांनी लिहून ठेवला आहे. पण माझ्या या पूर्ण मुलाखतीमधील ते दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही येणार नाही.” असे त्यांनी म्हटले आहे.
पुढे बोलताना त्यांनी,” त्या मुलाखतीमध्ये बोलताना मी ‘लाच’ हा शब्द वापरला. त्याविषयी दिलगिरी व्यक्त करतो असे म्हणत राहुल सोलापूरकर यांनी यासाठी हात जोडले आहेत. तसेच साम, दाम, दंड, भेद या तत्वानुसार शिवाजी महाराजांनी काम केलं. त्याविषयी बोलताना महाराजांचा अपमान करण्याचा हेतू कुठेही नव्हता असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे. तसेच गेली अनेक वर्ष मराठी चित्रपट आणि मालिकांमध्ये राहुल सोलापूरकर काम करत आहेत. ‘राजर्षी शाहू’ मालिकेत त्यांनी साकारलेली शाहू महाराजांची भूमिका बरीच गाजली होती. पण याच सोलापूरकरांनी छत्रपती शिवरायांबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्यानं वादाचा पिक्चर सुरू झाला.