छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखाण्याजवळ एका एसटी बसला अचानक आग लागल्याची घटना शुक्रवारी (दि.१४) सकाळी नऊ च्या सुमारास घडली आहे. सुदैवाने कसलीही हानी झाली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार, तुळजापूर डेपोची बसवकल्याण – तुळजापूर (एमएच २० बीएल २०९२) ही बस लोहारा तालुक्यातील लोकमंगल कारखान्याजवळ नऊच्या सुमारास आली. तेथील स्टॉप वर बसमधून काही प्रवासी उतरले. त्यानंतर काही शालेय विद्यार्थी या बसमध्ये चढले. त्यानंतर अचानक इंजिन जवळ आग लागल्याचे बस चालकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे त्यांनी लगेच बसमधील वाहक व प्रवाशांना बसमधून खाली उतरण्यास सांगितले. तोपर्यंत संपूर्ण बस धुराने व्यापली होती.
चालक व वाहकाने बसमधील सर्व प्रवाशांना खाली उतरवले. त्यानंतर हाकेच्या अंतरावर असलेल्या लोकमंगल कारखान्याच्या अग्निशमन गाडीला फोन करून सांगितले. त्यामुळे तात्काळ त्या अग्निशमन गाडीने येऊन ही आग विझवली. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही. चालकाने या घटनेची माहिती तुळजापूर आगार व्यवस्थापक शिंदे यांना सांगितलली तसेच लोहारा पोलीस ठाण्याशी संपर्क करून माहिती सांगितली. बसमधील प्रवाशांना लोहाऱ्याकडे जाणाऱ्या बसमध्ये बसवून पाठविण्यात आले. लोहारा पोलीस घटनेचा पंचनामा करीत आहेत.