मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड येथील सरपंच खून प्रकरण चर्चेत असतांना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सोमवारी पुन्हा एकदा राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा, असे त्या म्हणाल्यात. आता राजीनामा द्यायचा की नाही याचा निर्णय स्वतः मंत्रीच घेणार का? असा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी राष्ट्रवादीच्या नेतृत्वाला हाणला.
बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची गत 9 डिसेंबर रोजी निर्घृण हत्या झाली. या हत्या प्रकरणाशी संबंधित खंडणी प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मीक कराड याला अटक करण्यात आली आहे. त्यामुळे विरोधकांनी मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण मुंडे यांनी या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच योग्य तो निर्णय घेतील असे नमूद करत ही मागणी धुडकावून लावली आहे. या पार्श्वभूमीवर अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
अंजली दमानिया सोमवारी पत्रकारांशी बोलताना म्हणाल्या की, अजित पवारांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा कोणत्याही स्थितीत घेतला पाहिजे. तुम्ही जर म्हणत असाल की हे मंत्री ठरवेल, तर हा अक्षरशः मूर्खपणा आहे. असेच असेल तर तुम्ही सगळ्या यंत्रणा बंद करा. पोलिस यंत्रणा व भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागही बंद करा.
एक मंत्री ठरवेल की आपल्या भागात किती दहशत पसरवणार? किती पैसे खाणार? किती लोकांना त्रास देणार? कसा छळ करणार? हे सर्व मंत्री ठरवणार. कहर म्हणजे राजीनामा द्यायचा की नाही हे सुद्धा आता मंत्रीच ठरवेल. मुख्यमंत्री किंवा पक्ष ठरवणार नाही का? आम्ही वेडी माणसे आहोत का? असा उद्विग्न प्रश्न दमानिया यांनी यावेळी अजित पवारांवर टीका करताना केली.
दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते महबूब शेख यांनी भाजप आमदार सुरेश धस व मंत्री धनंजय मुंडे हे जय – विरू असून, त्यांचा दोस्ताना फार जुना असल्याचा दावा केला आहे. सुरेश धसांनी देशमुख हत्याकांडाप्रकरणी धनंजय मुंडे यांच्यावर ‘आकाचे आका’ म्हणत टीकेची झोड उठवली होती. तसेच त्यांचा राजीनामाही मागितला होता. पण आता त्यांनीच धनंजय मुंडेंची भेट घेऊन सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. या पार्श्वभूमीवर शेख यांनी त्यांच्यावर ही टीका केली आहे.