ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नरेंद्राचार्य महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान भोवले : राज्यभरात जोरदार आंदोलन !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी श्री संप्रदायाचे जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज यांचा एकेरी उल्लेख करत त्यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी नरेंद्राचार्य महाराजांचे शिष्य आणि अनुयायी आक्रमक झाले आहेत. श्री संप्रदायाच्या वतीने आज राज्यभरात विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात आंदोलन पुकारले आहे. विजय वडेट्टीवार यांनी माफी मागावी अशी मागणी नरेंद्राचार्य महाराज यांच्या शिष्य आणि अनुयायांनी केली आहे.

विधानसभा निवडणुकीत संघ आणि संघ प्रणित साधू संत यांनी हिंदुत्व वाचविण्यासाठी जनजागरण केले. साधू संत पाठीशी असल्यामुळे महायुतीचा विजय झाला. नरेंद्राचार्य महाराज यांचेही सहकार्य लाभले असे मत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एका कार्यक्रमात व्यक्त केले. या वक्तव्यामुळे आता महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले आहे. एकनाथ शिंदे यांच्या वक्तव्यावर टीका करताना काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्य महाराजांचा एकेरी उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केले.

दुसरीकडे, नरेंद्राचार्या महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी विजय वडेट्टीवार यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज स्वतः विजय वडेट्टीवार यांच्याविरोधात मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात आज तक्रार दाखल करणार आहेत. मुंबई उपनगरचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा हे नरेंद्राचार्य महाराज यांच्यासोबत तक्रार दाखल करणार आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी नरेंद्राचार्या महाराजांबाबत केलेल्या वादग्रस्त विधानावरून भक्तगण संतप्त झाले असून आंदोलन करत आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी आंदोलनकर्त्यांनी वडेट्टीवार यांच्या वक्तव्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अनेकांनी हातात पोस्टर आणि फलक घेत वडेट्टीवारांचा निषेध नोंदवला. विजय वडेट्टीवारांविरोधात नरेंद्र महाराजांचे मुंबई येथील अनुयायी आक्रमक झाले आहेत. मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर अनुयायांची गर्दी मोठ्या प्रमाणात आहे. अनुयायांकडून विजय वडेट्टीवारांविरोधात निदर्शने सुरू आहेत. नरेंद्र महाराज यांच्या अनुयायांकडून वडेट्टीवार यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!