ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा : शेतकऱ्यांचे वाढणार ‘या’ योजनेत ३ हजार रुपये !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील शेतकऱ्यांना आता चांगले दिवस येत असल्याचे दिसत आहे. आता केंद्र आणि राज्य सरकार शेतकऱ्यांच्या विकासासाठी समर्पित असून या दिशेने जोरकस प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचा फायदा होत आहे. राज्य शासनही केंद्राप्रमाणे राज्यातील शेतकऱ्यांना ‘नमो किसान सन्मान निधी योजनेंतर्गत’ ६ हजार रुपये देत असून लवकरच हे अर्थसाहाय्य ३ हजार रुपयांनी वाढवण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बिहारमधील भागलपूर येथे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या १९ व्या हप्त्याचे वितरण झाले. या वितरणाचा राज्यस्तरीय कार्यक्रम मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली वनामती येथील वसंतराव नाईक स्मृती सभागृहात आयोजित करण्यात आला. या वेळी ते बोलत होते. पीएम किसान सन्मान निधी योजनेंतर्गत केंद्र शासन वर्षाला शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट ६ हजार रुपये वितरित करते. तर राज्य शासनाच्या वतीने ‘नमो किसान

सन्मान निधी योजनेद्वारे’ शेतकऱ्यांना वर्षाकाठी ६ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात येते. आता राज्य शासन या निधीत ३ हजार रुपयांची वाढ करणार असून राज्याद्वारे ९ हजार आणि केंद्र शासनाचे ६ हजार असे शेतकऱ्यांना आता वर्षाला १५ हजार रुपयांचे अर्थसहाय्य मिळणार आहे.

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेच्या पहिल्या टप्प्याची अंमलबजावणी करण्यात आली असून दुसऱ्या टप्प्यात मराठवाडा व विदर्भातील उर्वरित भागात या योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत कृषी औजार, शेततळी आदी अनुदान पद्धतीने लक्षांक न ठेवता गावातील सर्व शेतकऱ्यांना सर्व योजनांचा लाभ देण्यात येणार आहे. ६ हजार कोटींच्या खर्चातून या योजनेंतर्गत आतापर्यंत कामे झाली असून येत्या काळात ही योजना अधिक प्रभावीपणे राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!