ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पावसाच्या फटक्याने राज्यात ‘लाल’ मिरचीच्या दरात मोठी घसरण !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील शीतगृहातील मिरचीचा शिल्लक असलेला मुबलक साठा अन् नव्या हंगामातील सुरू झालेली आवक, यामुळे बाजारात मागणीच्या तुलनेत लाल मिरची मोठ्या प्रमाणात उपलब्ध झाली आहे. परिणामी, दरात मोठी घसरण झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत भावात किलोमागे तब्बल 20 ते 250 रुपयांनी घट झाली असून, किलोचे भाव 40 ते 400 रुपयांपर्यंत पोहोचले आहेत.

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीतील भुसार बाजारात दररोज तीस ते पन्नास किलोंच्या दीड ते दोन हजार पोत्यांची आवक होत आहे. आंध्र प्रदेश, तेलंगण तसेच कर्नाटक भागातून मिरची बाजारात दाखल होत आहे. लाल मिरचीचा हंगाम हा दरवर्षी 15 जानेवारीनंतर सुरू होतो. तसेच, एप्रिल अखेरपर्यंत संपुष्टात येतो. गतवर्षी मिरचीचे उत्पादन कमी असल्याने मिरचीचे भाव चांगलेच वाढले होते.

अपेक्षित मागणीअभावी मिरचीचा साठा करण्याकडे व्यापारी वर्गाचा कल राहिला. त्यामुळे, शीतगृहामध्ये मोठ्या प्रमाणात मिरची शिल्लक राहिली. यंदा नवीन हंगामही जोरदार सुरू झाल्याने शहरातील बाजारपेठेत नव्यासह साठ्यातील मिरची बाजारात दाखल होत आहे. मागणीच्या तुलनेत आवक जास्त असल्याने दरात मोठी घसरण झाल्याचे मार्केट यार्डातील मिरचीचे व्यापारी सोपान राख यांनी नमूद केले.

राज्यात नंदुरबार, जालना तसेच छ. संभाजीनगर परिसरात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. यंदा लहरी हवामानाचा फटका राज्यातील मिरचीला बसला आहे. त्यामुळे बाजारात राज्यातील मिरची नसल्याचे चित्र आहे. एरव्ही एकूण आवकेच्या तुलनेत अवघी पाच ते दहा टक्के मिरची ही राज्यातून उपलब्ध होते. यामध्ये, जालना, औरंगाबाद येथून तेजा (लवंगी) तर नंदुरबार परिसरातून पांडी या मिरचीची बाजारात आवक होते.

भारतामध्ये आंध्र प्रदेशात सर्वाधिक लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. त्यानंतर कर्नाटक आणि पाठोपाठ मध्य प्रदेशात उत्पादन घेतले जाते. महाराष्ट्रातील खान्देशात लाल मिरचीचे उत्पादन घेतले जाते. तेलंगणात तिखट, तर कर्नाटकात कमी तिखटाच्या मिरचीचे उत्पादन घेण्यात येते. याशिवाय आसाम आणि पश्चिम बंगाल, पंजाब राज्यांमध्येही उत्पादन घेतले जाते.

घाऊक बाजारात असे आहेत दर (प्रतिकिलो)

मिरची दर (2024) – दर (2025)

काश्मिरी ढब्बी – 400 ते 650 रुपये- 280 ते 400 रुपये

ब्याडगी -250 ते 300 रुपये – 150 ते 200 रुपये

तेजा (लवंगी) -160 ते 240 रुपये – 140 ते 170 रुपये

गुंटूर – 200 ते 220 रुपये – 130 ते 160 रुपये

खुडवा गुंटूर – 80 ते 115 रुपये – 50 ते 70 रुपये

खुडवा ब्याडगी – 90 ते 110 रुपये – 40 ते 90 रुपये

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!