मुंबई : वृत्तसंस्था
कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने (EPFO) २०२4-२५ साठी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीवर ८.२५ टक्के एवढा व्याजदर कायम ठेवला आहे. देशातील सुमारे ७ कोटी नोकरवर्गासाठी हा महत्त्वाचा निर्णय मानला जात आहे.
२०२४-२५ मध्ये ‘ईपीएफओ‘ने २.०५ लाख कोटी रुपयांच्या ५.०८ कोटी दाव्यांवर प्रक्रिया केली. ही संख्या २०२३-२४ मधील ४.४५ कोटी दाव्यांपेक्षा अधिक आहे. २०२३-२४ साठी ८.२५ टक्के व्याजदर हा १.०७ लाख कोटी रुपयांच्या उत्पन्नावर आधारित होता. जो १३ लाख कोटी रुपयांच्या मुळ रकमेवरील आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. २०२२-२३ मध्ये भविष्य निर्वाह निधीवर ८.१५ टक्के व्याजदर होता, जो ११.०२ लाख कोटी रुपयांच्या मुळ रकमेवर ९१,१५१.६६ कोटींच्या उत्पन्नावर जाहीर करण्यात आला होता.
भविष्य निर्वाह निधीच्या व्याजदरांत चढ-उतार दिसून आले आहेत. २०१८-१९ मध्ये ८.६५ टक्के, २०१९-२० मध्ये ८.५ टक्के आणि २०२१-२२ मध्ये ८.१ टक्के व्याजदर राहिला असून त्यात घसरणीचा कल दिसून आला. ईपीएफचा सर्वाधिक व्याजदर २०१५-१६ मध्ये ८.८ टक्के आणि २०१३-१४ आणि २०१४-१५ मध्ये ८.७५ टक्के एवढा होता. २०२४-२५ साठी सध्याचा व्याजदर हा ८.२५ टक्के आहे. २०२३-२४ मध्ये व्याजदर ८.२५ टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आला होता. जो २०२२-२३ मध्ये ८.१५ टक्के एवढा होता.
दर महिन्याला पगारदार कर्मचारी त्यांच्या कमाईच्या १२ टक्के त्यांच्या EPF खात्यात योगदान देतात. दरम्यान, नियोक्ता ३.६७ टक्के रक्कम EPF खात्यात जमा करतात. उर्वरित ८.३३ टक्के कर्मचारी पेन्शन योजनेमध्ये (EPS) वितरीत केली जाते. नियोक्ता कर्मचाऱ्यांच्या एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स (EDLI) खात्यात ०.५० टक्के योगदानदेखील देतो.