मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून हत्या प्रकरणात आता महायुती सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे यांना राजीनामा द्यावा लागला आहे तर आता भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे स्वागत केले आहे. धनंजय मुंडेंचा राजीनामा फार आधीच व्हायला हवा होता. धनंजयने देखील आधीच राजीनामा द्यायला पाहिजे होता, असे त्या म्हणाल्या. धनंजय मुंडेचा राजीनामा घेणाऱ्यांनी आधी घेतला असता, तर त्याला गरिमामय एक मार्ग मिळाला असता. खुर्चीवर बसून विचार करताना राज्याच्या प्रत्येकाच्या सारख्याचा विचार केला पाहिजे. संतोष देशमुखांच्या जीवाच्या, परिवारांच्या वेदनांपुढे हा निर्णय मोठा नाही. देर आए दुरुस्त आए, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली.
महाराष्ट्रा, मुंबईत काय चाललेय ते नागपूरमध्ये माहिती नव्हते. इन्स्टाग्रामवरची पोस्ट बघून मुंबईत काय चाललेय ते माहिती आहे. मी जे व्यक्त होत आहे त्याचा सन्मान ठेवावा, हा विषय अत्यंत मानवी विषय आहे. माणुसकीचा विषय आहे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी पंकजा गोपीनाथ मुंडे आहे. त्यामुळे मी या विषयावर व्यक्त होणे आपल्याला अपेक्षा आहे. त्याप्रमाणे मी व्यक्त होत आहे. हा विषय माणुसकीच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संतोष देशमुखांना मारण्याच्या संदर्भातले काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. मला त्याविषयी माहिती नाही. पण इन्स्टाग्रामवर एक पोस्ट पाहिली. तेव्हा ते व्हिडिओ उघडायची किंवा बघायची माझी हिंमत झाली नाही. ज्यांना संतोष देशमुखांना जेवढ्या अमानुषपणे मारले आणि मारहाण करून व्हिडिओ केला. त्यांच्यामध्ये जेवढी निर्मनुष्यता आहे किंवा या व्हिडिओचा काही तरी वापर करायचा, असा कुणी प्रयत्न करत असेल, त्याच्यामध्ये देखील जी निर्मनुष्यता आहे, ती माझ्यामध्ये नाही. ते बघण्याची माझी हिंमत नाही, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
संतोष देशमुखांच्या हत्येनंतर मी पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांना पत्र दिले होते, 12 डिसेंबरचे माझे संपूर्ण भाषण पाहा, त्यात मी व्यक्त झालेली आहे. यामध्ये कोणाचा हात आहे, हे केवळ तपास यंत्रणेलाच माहिती आहे. त्यामध्ये कुठलाही हस्तक्षेप मी करण्याचे कारण नाही. ज्या मुलांनी ही हत्या केली, त्या मुलांमुळे समस्त राज्यातील समाज, ज्यांचा काहीही दोष नाही. तो सुद्धा मान खाली घालून गंभीरपणे वावरत आहे. खरे तर त्या समाजाची मुले आणि ज्याची इतकी निर्घृण हत्या झाली, तो समाज एका आक्रोशात वावरत आहे. समाज आणि जात याच्यावर बोलायची गरज नाही. पण आता परिस्थितीच अशी आहे. प्रत्येक गोष्ट जातीवर जाते. गुन्हेगाराला कुठलीही जात नसते. कुणाला निर्दयीपणे संपवणाऱ्याला कुठलीही जात नसते. त्याच्यावर निर्णय घेणाऱ्या राज्यकर्त्याना सुद्धा जात नसली पाहिजे, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.
मी मनापासून संतोष देशमुखांच्या आईची क्षमा मागते जेव्हा आम्ही या खुर्चीवर बसलो, मी बसले, तेव्हा आमदारकीची एक शपथ घेतलेली आहे. कुठलाही ममत्व भाव न बाळगता, कुणा विषयीही कसला आकस किंवा द्वेष न बाळगता काम करायला पाहिजे, यावर मी ठाम आहे. संतोष देशमुखांच्या झालेल्या निर्घृण हत्येवर निषेध व्यक्त करताना मी मनापासून संतोष देशमुखांच्या आईची क्षमा मागते. कारण ज्या मुलांनी ही निर्घृण हत्या केली, ते माझ्या पोटचे असते, तरी मी हेच म्हटले असते की त्यांना कडक शासन करा. याच्यापलीकडे कोणताही राजकीय नेता एखादे व्यक्तिमत्व कोणतेही भाष्य करू शकत नाही, असे सांगताना पंकजा मुंडे भावूक झाल्याचे पाहायला मिळाले.
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याचे मी स्वागत करते. हा राजीनामा फार आधी व्हायला पाहिजे होता. या राजीनाम्यापेक्षा शपथच व्हायला नको होती. तर या सगळ्या गोष्टींना कदाचित सामोरे जावे लागले नसते. राजीनामा घेणाऱ्यांनी सुद्धा आधी घ्यायला पाहिजे होता. धनंजयने सुद्धा आधी द्यायला पाहिजे होता. या सगळ्या वेदनांपासून कदाचित गरिमामय त्याला मार्ग मिळाला असता. मी त्याची बहीण असले, तरी आम्ही वेगवेगळ्या पक्षात काम केले होते. पण कोणत्याही आईला, बहिणीला, परिवाराला वाटत नाही की, आपल्या परिवारातील सदस्याला या दु:खातून जावे लागेल. पण जेव्हा आपण खुर्चीवर बसून विचार करत असतो, तेव्हा आपण राज्याच्या प्रत्येकाच्या सारख्याचा विचार केला पाहिजे. त्या पोराच्या परिवाराच्या, त्याच्या जिवाच्या वेदनांपुढे धनंजय मुंडेंचा राजीनामा काहीही मोठा निर्णय नाही. धनंजय मुंडेंनी जो निर्णय घेतला, ते योग्यच केले आहे. मला वाटते देर आए दुरुस्त आए, असे मत पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले.