मुंबई : वृत्तसंस्था
इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना धमकी देणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक विधान करणाऱ्या प्रशांत कोरटकर याच्यावर करवाई करण्याची मागणी विधान परिषदेत विरोधकांनी केली. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोरटकर चिल्लर माणूस आहे, असे म्हटले आहे. यावर टीका करताना फडणवीस यांनी भैय्याजी जोशी देखील चिल्लर माणूस असल्याचे जाहीर करावे, नाहीतर त्यांच्यावर राजद्रोहचा गुन्हा दाखल करावा, असे आव्हान माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज (दि. ६) दिले. ते पत्रकारांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, या लोकांनी हिंदू- मुस्लिम असा वाद काढला नाही, तर आता मराठी- मराठी असा वाद काढलेला आहे. भैय्याजी जोशी घाटकोपरमध्ये येऊन काल बरळून गेले. त्यांना त्यांना मी आव्हान करतो की, अशी गोष्ट कर्नाटक, तामिळनाडू, बंगालमध्ये जाऊन बोलून दाखवा, अशी भाषा केल्यानंतर तेथून सुखरूप परत येऊन दाखवा, असे आव्हान त्यांनी दिले.
सगळे लोक छावा चित्रपटाला बघायला गेले नव्हते. काही अनाजी पंतही गेलेले नाहीत. अनाजी पंत याही काळात जन्माला आलेले आहेत. जसे काय आम्हीच सगळ्यांना ब्रह्मज्ञान शिकवले आहे, असा भास करून काही लोक वावरत आहेत, असा टोला उपंमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला लगावला.
भाजपला उत्तर विरुद्ध दक्षिण अशी देशाची विभागणी करायची आहे. भाजपला इंडिया नाहीतर हिंदीया करायचा आहे. भाजपमध्ये असलेल्या सगळ्या लोकांना जर मराठी भाषेबद्दल काही वाटत असेल, तर जोशी य़ांच्यावर कारवाई केली पाहिजे. अन्यथा हा संघाचा छुपा अजेंडा असल्याचा स्पष्ट होईल. भाजपची आणि संघाची अशी प्रवृत्ती आहे की, त्या ठिकाणी पिल्लू सोडायचं आणि पिल्लू मोठे झाले की खांद्यावरती घ्यायचे, अशी टीका टाकरे यांनी यावेळी केली.