ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बॅटने अमानुष मारहाण : आरोपी सुरेश धसांचा कार्यकर्ता असल्याचा आरोप !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील बीड येथील सरपंच देशमुख हत्या प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना मंत्रीपदाचा राजीनामा दोन दिवसापूर्वीच दिला असतांना आता बीडच्या शिरुर येथील एका व्यक्तीला बॅटने अमानुष मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असलेल्या सतीश भोसलेवर गुन्हा दाखल केला आहे. यामुळे त्याला केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सविस्तर वृत्त असे कि, सतीश भोसले याचा एका व्यक्तीला मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी हा व्हिडिओ पोस्ट करत या प्रकरणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भाजप आमदार सुरेश धस यांच्याकडे स्पष्टीकरण मागितले होते. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी भाजपचा कार्यकर्ता असणाऱ्या सतीश भोसले याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

शिरुर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक धनंजय कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून सतीश भोसले विरोधात शिरुर पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 324, 323, 506 व 34 नुसार गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पोलिस आता त्याचा शोध घेत आहेत. सतीश भोसलेने बीडमधील शिरुर परिसरात पीडित व्यक्तीला बॅटने नेमकी कुठे मारहाण केली? ते घटनास्थळ अद्याप स्पष्ट झाले नाही. पण तरीही पोलिसांनी त्याला कायद्याचा बडगा दाखवत त्याच्यावर कारवाई केली आहे. त्याच्या मागावर पोलिसांनी पुणे व अहिल्यानगर येथे पथक रवाना केले आहे, अशी माहिती पोलिस निरीक्षक गणेश धोकरट यांनी दिली आहे.

दुसरीकडे, सतीश भोसले हा भाजप आमदार सुरेश धस यांचा कार्यकर्ता असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्याचे व सुरेश धस यांचे काही फोटो व व्हिडिओही समोर आलेत. स्वतः धस यांनीही सतीश भोसले हा आपला कार्यकर्ता असल्याचे मान्य केले आहे. पण त्याच्या या कृत्याशी आपले कोणतेही देणेघेणे नसल्याचे ठणकावून सांगितले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!