ध्यास विश्वसार्ह बातमीचा

छत्रपती संभाजी महाराजांप्रमाणेच माझाही छळ झाला : ठाकरेंच्या नेत्याचा मोठे वक्तव्य !

मुंबई : वृत्तसंस्था

देशभर ‘छावा’ चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत असून आता राज्याच्य राजकारणात देखील ‘छावा’ चित्रपटाचा उल्लेख होत असतांना दिसून येत आहे. संभाजी महाराजांचा विचार, वारसा कोणी चालवला असेल तर ‘छावा’ बघा आणि मलापण बघा. धर्म बदलावा म्हणून त्यांचा छळ झाला आणि माझा पक्षा बदलावा म्हणून छळ झाला, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केले आहे.

अनिल परब यांनी स्वत:ची तुलना छत्रपती संभाजी महाराज यांच्याशी केल्याने त्यांच्यावर टीका केली आहे. परबांच्या वक्तव्यावर आज विधानसभेत वातावरण तापण्याची शक्यता आहे. तर भाजपनेही त्यांच्या या विधानानंतर आक्रमक भूमिका घेतली असून ते याविरोधात आंदोलन करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेवर बोलताना अनिल परब यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख करत हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, प्रशांत कोरडकर आणि राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा अपमान केला. परंतु त्यांच्यावर कारवाई करण्याची सरकारी हिंमत नाही. तुम्ही त्यांना वाचवतात आणि राज्यपालांना चुकीची माहिती देता. मुख्यमंत्री म्हणतात की, कोरटकर हा चिल्लर आहे. चिल्लर आहे तर मग त्याची हिंमत कशी झाली महाराजांविरोधात बोलताना? महाराजांचा अपमान करणाऱ्या सोलापूरकरविरोधात एकाही मंत्र्याने निषेध व्यक्त केला नाही. सरकार आणि राज्यपाल हे संभाजी महाराजांना विसरले आहेत. महाराज हे आपले दैवत आहेत. त्यामुळे त्यांच्याविरोधात बोलणाऱ्यांना सरकारने माफ करू नये. अनिल परब पुढे बोलताना म्हणाले की, ईडीची नोटीस, ईडीची कारवाई, सीबीआय, इन्कम टॅक्स चांगलचे आहे ना, मी पण तेवढाच कडक आहे. संजय राऊत गेले, थोडे कच्चे निघाले, मी तुम्हाला पुरून उरलो. माझ्यावरती अनन्य अत्याचार झाले आहेत, मी सगळे भोगलेले आहे, पण मी देखील त्यांचा वारसा जपणारा आहे.

अनिल परब म्हणाले की, मी पक्ष बदलला नाही याचा मला अभिमान वाटतो. जे पक्ष बदलून गेले ते आता आम्हाला छत्रपती संभाजी महाराज यांचा वारसा सांगत आहे. मला छत्रपती संभाजी महाराज यांच्या वारशावरती बोलण्याचा हक्क आहे, तुम्हाला नाही असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!