ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शेतकर्‍यांना दिलासा : टोमॅटोच्या दरात तेजी

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असून काही ठिकाणी उन्हाचा तडाखा सुरु आहे. मे महिन्यात झालेल्या मान्सूनपूर्व पावसामुळे टोमेटो उत्पादकांना मोठा फटका बसला आहे. पावसामुळे टोमॅटोचे उत्पादन कमालीचे घटले असून, अनेक शेतकर्‍यांना शेतातील पीक फेकून द्यावे लागले आहे. मात्र, आवक कमी झाल्याने सध्या 22 किलोच्या क्रेटला 500 ते 600 रुपये भाव मिळत असल्याने शेतकर्‍यांमध्ये काही प्रमाणात समाधान व्यक्त होत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये लागवड केलेल्या बहुतांश टोमॅटोच्या बागा मे महिन्यातील पावसामुळे पूर्णपणे वाया गेल्या आहेत.

अनेक शेतकर्‍यांना अर्ध्याहून अधिक टोमॅटो शेतातच सोडून द्यावे लागले. यामुळे शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. वाढलेल्या भावाने काही प्रमाणात दिलासा मिळत असला, तरी झालेल्या नुकसानीची भरपाई होणे कठीण असल्याचे अनेक शेतकर्‍यांनी म्हटले आहे.

नारायणगाव येथील जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये सध्या आवक कमी झाली आहे. मुंबईच्या व्यापार्‍यांची वाढलेली उपस्थिती आणि कमी आवक यामुळे 22 किलोच्या क्रेटला 200 ते 500 रुपये भाव मिळत आहे.

सकाळी 7 वाजता सुरू होणारे हे मार्केट 10 वाजेपर्यंत टोमॅटोची विक्री पूर्ण करते. संगमनेर, अकोला, पारनेर, बीड, येवला, आंबेगाव, खेड, शिरूर आणि बारामती या तालुक्यांमधूनही शेतकरी नारायणगाव मार्केटमध्ये टोमॅटो विक्रीसाठी आणतात, कारण येथे चांगला भाव आणि योग्य सोयीसुविधा मिळतात.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!