पत्रकार प्रशांत माने लिखित ‘लोकाभिमुख पत्रकारिता’ पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
सुशीलकुमार, मोहिते-पाटील, सुभाषबापू यांच्या उपस्थितीत हेरिटेज येथे कार्यक्रम
सोलापूर : प्रतिनिधी
नवोदित पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल अशा आशयाचे पत्रकार प्रशांत माने लिखित लोकाभिमुख पत्रकारिता या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा रविवार, दि. 29 जून रोजी सकाळी 10.30 वाजता होटगी रोड गांधीनगर येथील हेरिटेल गार्डन कार्यालयात होणार आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील, माजी सहकार मंत्री आ. सुभाषबापू देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, खा. धैर्यशील मोहिते-पाटील, आ. देवेंद्र कोठे, ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. धनंजय माने, दैनिक तरुण भारतचे कार्यकारी संचालक दिलीप पेठे, ज्येष्ठ संपादक राजा माने यांच्या उपस्थितीत हा प्रकाशन सोहळा संपन्न होणार आहे.
तीस वर्षांच्या पत्रकारिता प्रवासातील अनुभव आणि पत्रकारितेत नव्याने येणार्या नवोदित पत्रकारांसाठी उपयुक्त ठरेल अशा आशयाचे पुस्तक लेखक पत्रकार प्रशांत माने यांनी लिहिलेले असून जागृती प्रकाशनने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. पत्रकारांना उपयुक्त आशयासह काही कानमंत्रदेखील पुस्तकातून देण्यात आलेले आहेत.
या पुस्तकातून प्रशांत माने यांच्या बातम्यांची कात्रणे देखील नवोदित पत्रकारांना अभ्यासासाठी प्रसिध्द करण्यात आलेली आहेत. पत्रकारांचे राजकीय आणि सामाजिक ऋणाणुंबध कसे असावेत यावर देखील पुस्तकातून छायाचित्रांच्या माध्यमातून प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. वाचकांसह नवोदित पत्रकारांच्या पसंतीस पडेल अशा या लोकाभिमुख पत्रकारिता पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यासाठी सर्वांनी आवर्जुन उपस्थित रहावे, असे आवाहन लेखक पत्रकार प्रशांत माने यांनी केले आहे.