ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात : ७ ठार, ३० हून अधिक जखमी

पुणे : वृत्तसंस्था

राज्यातील अनेक ठिकाणी अपघाताच्या घटना घडत असतांना आता पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यात श्रावण महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी कुंडेश्वर येथील शिवमंदिराच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या पिकअप टेम्पोला भीषण अपघात झाला. दुपारी सव्वा एक वाजण्याच्या सुमारास नागमोडी वळणावर घाट चढताना टेम्पो रिटर्न आल्याने तो १०० फूट खोल दरीत कोसळला.

या दुर्दैवी घटनेत ७ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ३० पेक्षा अधिक भाविक गंभीर जखमी झाले. जखमींमधील अनेकांची प्रकृती चिंताजनक असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हा टेम्पो कुंडेश्वर येथील शिवमंदिराच्या दर्शनासाठी ३५ हून अधिक भाविकांना घेऊन जात होता, यामध्ये बहुतांश महिला भाविक होत्या. अपघाताच्या वेळी वाहनाने ५ ते ६ पलट्या खाल्ल्या, ज्यामुळे प्रवाशांना गंभीर दुखापत झाली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिकांनी आणि खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने रुग्णवाहिकांद्वारे जवळच्या चांडोली ग्रामीण रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले. १० रुग्णवाहिकांचा वापर करून बचावकार्य राबवण्यात आले. खेड पोलिसांनी अपघाताच्या कारणांचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक माहितीनुसार, वाहनाचा वेग, चालकाचा निष्काळजीपणा किंवा रस्त्याच्या परिस्थितीमुळे हा अपघात घडला असावा, अशी शक्यता आहे. नागमोडी वळणांवर आणि घाटरस्त्यांवर अशा घटना वारंवार घडत असल्याने, रस्ते सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. यापूर्वीही खेड तालुक्यातील शिरोली गावाजवळ १४ फेब्रुवारी २०२३ रोजी झालेल्या अपघातात ५ महिलांचा मृत्यू आणि १३ जण जखमी झाले होते, ज्यामुळे या भागातील रस्त्यांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

मयत नागरिक महिला
१) शोभा ज्ञानेश्वर पापड
२) सुमन काळूराम पापड
३) शारदा रामदास चोरगे
४) मंदा कानिफ दरेकर
५) संजीवनी कैलास दरेकर
६) मिराबाई संभाजी चोरगे
७) बायडाबाई न्यानेश्वर दरेकर
८) शकुंतला तानाजी चोरघे

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!