ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पूजा खेडकरच्या आईचा ‘गुंडगिरी’ अवतार? ट्रक चालकाला डांबलं, पोलिसांनाही अडवलं”

मुंबई : वृत्तसंस्था

निलंबित प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्यावर गंभीर आरोपांचा भडिमार सुरूच आहे. ताज्या घटनेत त्यांनी नवी मुंबईतील किरकोळ अपघातानंतर ट्रक चालकाचे कथित अपहरण करून त्याला पुण्यातील आपल्या घरी डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. पोलिसांनी ट्रक चालकाची सुटका केली असून, मनोरमा खेडकर यांच्यावर अपहरण, शासकीय कामात अडथळा आणि पोलिसांशी असहकार यासह विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही घटना शनिवारी सायंकाळी नवी मुंबईतील ऐरोली सिग्नलजवळ घडली. मनोरमा खेडकर यांच्या कारला एका ट्रकचा किरकोळ धक्का लागल्यानंतर दोघांनी ट्रक चालक प्रल्हाद कुमार याला कारमध्ये बसवून जबरदस्तीने पुण्यातील बंगल्यात नेले. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याची तक्रार रबाळे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली.

14 सप्टेंबर रोजी नवी मुंबई पोलिसांचे पथक पुण्यातील चतुश्रृंगी येथील खेडकर यांच्या बंगल्यावर पोहोचले. मात्र, मनोरमा खेडकर यांनी पोलिसांशी सहकार्य करण्याऐवजी त्यांच्यावर पाळीव कुत्रे सोडल्याचा आरोप झाला आहे. तसेच, त्यांनी दरवाजा बंद करून चौकशी टाळली. दरम्यान, अपहरण करणारा कारचालक आरोपी बंगल्यातून पसार झाला.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणा हलली असून, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक उत्तम भजनावळे आदी अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली. मनोरमा खेडकर यांना चौकशीसाठी समन्स बजावण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!