---Advertisement---

“राज्यपालपदाचा कार्यभार आचार्य देवव्रत यांच्याकडे; राजभवनात शपथविधी संपन्न”

By team
On: September 15, 2025 4:38 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

महाराष्ट्राचे नवे राज्यपाल म्हणून आचार्य देवव्रत यांनी आज राजभवनात पदाची शपथ घेतली. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांच्या हस्ते झालेल्या या शपथविधी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्रीमंडळातील काही मान्यवर, वरिष्ठ अधिकारी आणि इतर खास निमंत्रित उपस्थित होते.

गुजरातचे राज्यपाल म्हणून कार्यरत असलेल्या आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. त्यांनी शपथविधीनंतर पत्रकारांशी बोलताना राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.

शपथविधी सोहळ्यानंतर राजभवनात अधिकृत स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी विविध मान्यवरांनी आचार्य देवव्रत यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि प्रशासकीय क्षेत्रातील दीर्घ अनुभवाचा उल्लेख करत, त्यांच्या कार्यकाळात राज्यपालपदाची जबाबदारी प्रभावीपणे पार पडेल, असा विश्वास व्यक्त केला.

याआधी, महाराष्ट्राचे राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपतीपदासाठी निवड झाल्यानंतर आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ११ सप्टेंबर रोजी अधिकृत आदेश जारी करून आचार्य देवव्रत यांच्याकडे महाराष्ट्राच्या राज्यपालपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपवला.

गुजरातहून तेजस एक्स्प्रेसने मुंबईत दाखल झाल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई सेंट्रल स्थानकावर पुष्पगुच्छ देऊन राज्यपाल आणि त्यांच्या पत्नी दर्शना देवी यांचे स्वागत केले. त्यांना रेल्वे पोलिस आणि मुंबई पोलिसांकडून मानवंदना देण्यात आली.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!