सोलापूर : वृत्तसंस्था
राज्यातील अनेक जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी नुकतीच माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेट दिली. या भेटीदरम्यान एका लाडक्या बहिणीने पडक्या घरात पालकमंत्र्यांचे स्वागत करत ओवाळले. तसेच घर बांधून देण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी देखील लाडक्या बहिणीला घर बांधून देण्याचे आश्वासन दिले.
डीपीडीसीच्या माध्यमातून पूरग्रस्त कुटुंबांना 18 वस्तूंनी भरलेले दिवाळी किट देण्यात येत आहेत. शासनाने यंदा दिवाळी गोड करण्यासाठी विशेष प्रयत्न करताना, पूरग्रस्तांना न्याय देण्याचं आश्वासनही दिलं आहे. जयकुमार गोरे यांनी नुकतेच माढा तालुक्यातील पूरग्रस्त गावांना भेटी देत पीडित कुटुंबांना ‘दिवाळी किट’ आणि ‘भाऊबीज भेट’ यांचे वाटप केले. यावेळी, केवड, उंदरगाव आणि वाकाव या गावांना त्यांनी भेट दिली. या वेळी प्रत्येक कुटुंबाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहीचे पत्र देण्यात आले. या पत्रात “देवा भाऊ” तुमच्या पाठीशी असल्याचे आश्वासन देण्यात आले होते.
जयकुमार गोरे हे केवड गावात पोहोचले असता, या गावातील विद्या भोकरे नावाच्या महिलेने पालकमंत्र्यांचे आपल्या पडलेल्या घरातच औक्षण करत स्वागत केले. पूरामुळे तिचे संपूर्ण घर जमीनदोस्त झाले असून, शेतातील पीकही वाहून गेले आहे. चारही बाजूंनी कोसळलेल्या घरात राहण्याची बिकट परिस्थिती सांगून त्यांनी पालकमंत्र्यांकडे घरकुल बांधून देण्याची मागणी केली. यावर पालकमंत्र्यांनी तिला घरकुल देण्याचे आणि शेतीच्या नुकसानीबाबत मदत देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर त्यांनी आणलेली मदत विद्याताईंना सुपूर्द केली.
दरम्यान, यंदाच्या दिवाळीपूर्वी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेती आणि घरांचे नुकसान झाले. विशेषतः सीना नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांमध्ये हाहाकार माजला. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेले पीक वाहून गेले, तर अनेकांचे संसार उघड्यावर आले.अशा कठीण परिस्थितीत शासन आणि काही सामाजिक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला. सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक पूरग्रस्त कुटुंबाला मुख्यमंत्र्यांच्या सहीचे पत्र देण्यात येणार असून, यात ‘तुमचा देवा भाऊ तुमच्या पाठीशी आहे,’ असे सांगत दिवाळीच्या शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.