नागपूर : वृत्तसंस्था
जिल्ह्यात काँग्रेसमधील गटबाजी आणि नाराजी दिवसेंदिवस वाढत असून पक्षासाठी ती गंभीर ठरत आहे. येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सोमवारी वाडी नगरपरिषदेचे शहराध्यक्ष शैलेश थोराने यांच्यासह सुमारे 120 कार्यकर्त्यांनी काँग्रेसला सामूहिक राजीनामे देत धक्का दिला. राजीनामा देणाऱ्यांमध्ये नागपूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष प्रकार कोकाटे आणि जिल्हा काँग्रेसचे महासचिव अनिल पाटील यांसारखे महत्त्वाचे पदाधिकारीही आहेत.
राजीनाम्यात त्यांनी माजी मंत्री सुनील केदार यांच्या हुकूमशाही शैलीच्या कारभारामुळे पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्वासमोर वाढती नाराजी आणि गळती रोखण्याचे गंभीर आव्हान उभे राहिले आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसने वाडी नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) मधून आलेल्या प्रेम झाडे यांना उमेदवारी दिली होती. मात्र झाडे यांनी त्याच पदासाठी राष्ट्रवादीकडूनही अर्ज भरल्याचे उघड झाल्याने स्थानिक काँग्रेस कार्यकर्त्यांचा असंतोष आणखी तीव्र झाला. दुहेरी राजकारण करणाऱ्या उमेदवारावर पक्षाने कोणतीही ठोस कारवाई न केल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी वाढल्याचे सांगितले जाते.
माजी मंत्री सुनील केदार यांच्या नेतृत्वशैलीवर अनेकांनी भेदभाव आणि मनमानीचे आरोप केले आहेत. स्थानिक स्तरावर मेहनत घेणाऱ्या कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष करून बाहेरून आलेल्या व्यक्तींना महत्त्वाच्या उमेदवार्या दिल्या जात असल्याने अंतर्गत असंतोष सार्वजनिक रूपात समोर येत आहे.
नागपूर ग्रामीणपासून शहरी भागापर्यंत काँग्रेसमधील गळती सातत्याने वाढत आहे. कामठी विधानसभा क्षेत्रात काँग्रेस नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश सुरू असून मंगळवारी आणखी काही माजी पदाधिकारी भाजपमध्ये दाखल होणार असल्याची माहिती आहे. काही दिवसांपूर्वी प्रदेश काँग्रेसचे सचिव प्रसन्ना तिडके यांनीही अशाच कारणांमुळे भाजपची वाट धरली होती.
या सर्व घडामोडींमुळे नागपूर काँग्रेसची आगामी स्थानिक निवडणुकांसाठीची तयारी मोठ्या प्रमाणात ढासळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. परिस्थिती गंभीर झाल्याने सुनील केदार यांच्यावर पक्षाकडून शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यताही नेमली जात आहे. आता काँग्रेस नेतृत्वाने गटबाजी शमवून नाराज कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात कितपत यश मिळते, यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत.