बीड : वृत्तसंस्था
सध्या राज्यभर डॉ. गौरी पालवे मृत्यू प्रकरणानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादाला प्रकाश महाजन यांच्या तीक्ष्ण प्रतिक्रियेने आणखी उधाण आले आहे. पंकजा मुंडे यांच्या नावाचा राजकारणात वापर करून अनावश्यक टीका केली जात असल्याचा आरोप त्यांनी अंजली दमानिया यांच्यावर केला. दमानिया या केवळ पंकजा मुंडे यांच्या विरोधासाठीच प्रकरणात उडी घेत आहेत, असा दावा करत महाजन म्हणाले की, पंकजाचं नाव आलं की दमानिया बिळातून बाहेर येतात. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणापासून बीडमधील इतर घटनांपर्यंत दमानिया दिसल्या नाहीत, पण पंकजांच्या संदर्भातील कोणत्याही मुद्द्यावर त्या अचानक आवाज उठवतात, असा आरोप त्यांनी केला. पंकजाच्या विरोधात बोलण्यासाठी त्या व्हेंटिलेटरवरूनही उठतील, अशा कठोर शब्दांत महाजन यांनी दमानिया यांच्यावर हल्ला चढवत राजकीय वातावरण अधिक तापवले आहे.
पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्या पीए अनंत गर्जे यांच्या पत्नी डॉ. गौरी गर्जे- पालवे यांच्या रहस्यमय मृत्यूप्रकरणामुळे राज्यात मोठी खळबळ उडाली आहे. वरळीतील घरात त्यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली असली तरी कुटुंबीयांनी हा प्रकार आत्महत्या नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप केला आहे. गौरीला गेल्या काही महिन्यांपासून अनंत गर्जे आणि त्याच्या कुटुंबीयांकडून मानसिक छळ सहन करावा लागत असल्याचे तिच्या नातेवाईकांनी सांगितले. विशेषतः अनंत गर्जेचे इतर एका महिलेबरोबर संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर घरातील तणाव वाढल्याची माहितीही समोर आली आहे.
या आरोपांनंतर पोलिसांनी तातडीने चौकशी सुरू केली असून अनंत गर्जेवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रविवारी रात्री उशिरा त्याला अटक करण्यात आली. चौकशीत अनेक महत्त्वाचे मुद्दे पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. स्थानिक पातळीवरही या घटनेविषयी तीव्र संताप व्यक्त होत असून न्याय मिळावा, यासाठी गौरीच्या कुटुंबीयांनी ठाम भूमिका घेतली आहे. वैद्यकीय क्षेत्राशी निगडित असलेल्या एका तरुणीचा असा अकाली मृत्यू झाल्याने अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत.
या प्रकरणानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सरकार आणि पोलिस प्रशासनावर टीका करताच राजकीय वातावरण अधिक तापले. दमानिया म्हणाल्या की, गौरीने आत्महत्या केली असे स्वतःला वाटत नाही. तसेच घटनेच्या रात्रीच पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी पोलिसांना कडक कारवाईचे आदेश द्यायला हवे होते, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. माझा पीए असेल तरी योग्य ती कारवाई करा, असे पंकजा मुंडेंनी सांगितले असते तर प्रशासन अधिक तत्परतेने हालले असते, असे दमानिया यांनी म्हटले. त्यांच्या या वक्तव्यामुळे प्रकरणाला राजकीय वळण मिळाले.
अंजली दमानिया यांच्या या आरोपांना प्रत्युत्तर देताना पंकजा मुंडे यांच्या मामांनी प्रकाश महाजन यांनी जोरदार हल्लाबोल केला. पंकजा मुंडे यांचे नाव ऐकले की दमानिया बिळातून बाहेर येतात, अशा कठोर शब्दांत त्यांनी टीका केली. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात किंवा बीडमधील वर्गातील घटनेत त्या कुठे दिसल्या नाहीत, असा सवालही त्यांनी केला. आपल्याला पंकजा नावाचा कावीळ झाला आहे. पंकजाच्या विरोधात बोलण्यासाठी तुम्ही व्हेंटिलेटरवरूनसुद्धा उठाल, असे वादग्रस्त वक्तव्य करत त्यांनी दमानिया यांच्यावर थेट हल्ला चढवला.