---Advertisement---

हृदयद्रावक : “जिवलग मैत्रीचा शोकांत शेवट : काही तासांच्या अंतराने दोन तरुणांनी संपविले आयुष्य !

By team
On: November 24, 2025 3:26 PM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यात दोन तरुण मित्रांनी काही तासांच्या अंतराने आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. वांगी गावात घडलेल्या या दुर्दैवी प्रसंगाने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. गोरख भोई आणि सुरेश भोई अशी या दोघा तरुणांची नावे असून ते अतिशय जिवलग मित्र होते. गोरखच्या अचानक मृत्यूनंतर झालेल्या मानसिक धक्क्याने दुसऱ्या मित्रानेही जीवन संपवले, अशी माहिती स्थानिकांकडून मिळाली आहे.

शुक्रवारी रात्री गोरख भोई यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. गावकऱ्यांना या घटनेचा धक्का बसलेला असतानाच दुसऱ्या दिवशी त्यांचा अंत्यविधी सुरू झाला. त्या वेळी गोरखचा जिवलग मित्र सुरेश भोई अतिशय व्यथित दिसत असल्याचे साक्षीदारांनी सांगितले. अंत्यविधीचा विधी सुरू असतानाच तो एकटा शेताच्या दिशेने निघून गेला आणि तिथे झाडाला दोर लावून आत्महत्या केली. काही वेळाने त्याचाही मृतदेह आढळल्यानंतर गावात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

या दुहेरी आत्महत्यांची नोंद मंद्रूप पोलिस ठाण्यात स्वतंत्रपणे करण्यात आली असून पोलिसांनी प्राथमिक तपास सुरू केला आहे. दोन्ही तरुणांनी इतके टोकाचे पाऊल का उचलले याची चौकशी सुरू आहे. कुटुंबीयांनी दोघांच्या वागण्यात काही वेगळेपणा जाणवला नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे या घटनेमागील नेमका संदर्भ शोधणे पोलिसांसमोर आव्हान ठरत आहे.

या प्रसंगानंतर गावातील ज्येष्ठ नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी मानसिक आरोग्य, समुपदेशन आणि भावनिक आधाराची गरज तातडीची असल्याचे मत व्यक्त केले आहे. तरुणांच्या अशा मृत्यूनंतर गावात हळहळ आणि दुःखाचे वातावरण पसरले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!