सोलापूर वृत्तसंस्था – डिलिमिटेशन विधेयकावरून राज्याच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी या विधेयकाला विरोध केला असताना त्यांचे वडील आणि माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र विधेयकाच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे. त्यामुळे शिंदे कुटुंबातील दोघांच्या वेगवेगळ्या भूमिका चर्चेचा विषय ठरल्या आहेत.
केंद्रातील मोदी सरकारने डिलिमिटेशन विधेयकावर चर्चा करण्यासाठी संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. या विधेयकाला मंजुरी मिळवण्यासाठी एनडीए सरकारकडून विविध पक्षांचा पाठिंबा मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने विधेयकाला पाठिंबा दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. दुसरीकडे तामिळनाडूतील डीएमकेनेही या विधेयकाला समर्थन दिले आहे.
दरम्यान, काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शरद पवार यांच्या राज्यसभेच्या जागेसह विविध मुद्द्यांवर राष्ट्रवादीने यापूर्वी काँग्रेसची मदत घेतली. मात्र, आता डिलिमिटेशन विधेयकाच्या बाजूने मतदान केले जात असेल, तर ती केवळ काँग्रेसशी नव्हे, तर देशाशी गद्दारी असल्याची टीका त्यांनी केली.
संविधान आणि लोकशाहीच्या विरोधात जाऊन या विधेयकाला पाठिंबा देण्याची एवढी काय मजबुरी आहे, असा सवालही प्रणिती शिंदे यांनी उपस्थित केला. हा विषय केवळ काँग्रेस किंवा इंडिया आघाडीपुरता मर्यादित नसून देश, संविधान आणि लोकशाहीशी संबंधित असल्याचे त्यांनी म्हटले.
सुशीलकुमार शिंदे म्हणतात, डिलिमिटेशन होणे गरजेचे!
एकीकडे मुलगी प्रणिती शिंदे विधेयकाला विरोध करत असताना माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी मात्र आपली वैयक्तिक भूमिका स्पष्ट केली आहे. लोकसंख्या वाढत असेल, तर लोकप्रतिनिधींची संख्याही वाढली पाहिजे. त्यामुळे डिलिमिटेशन होणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
काँग्रेसची अधिकृत भूमिका आणि आपले वैयक्तिक मत वेगळे असल्याचेही सुशीलकुमार शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यामुळे डिलिमिटेशनच्या मुद्द्यावर बाप-लेकींच्या भूमिकांमध्ये नेमका विरोधाभास समोर आला असून, राजकीय वर्तुळात या मतभेदांची चर्चा रंगली आहे.











