कोल्हापूर वृत्तसंस्था – देशातील लोकशाही संपवण्याचा भाजपचा प्रयत्न सुरू असून, मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचा डाव आखला जात असल्याची टीका काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी केली आहे. महिला आरक्षणाला काँग्रेसचा विरोध नसून, या विधेयकाच्या आडून राजकीय स्वार्थ साधण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
केंद्र सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलावले असून, त्यात मतदारसंघ पुनर्रचना विधेयकावर चर्चा होण्याची शक्यता आहे. या विधेयकाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर राजकीय वातावरण तापले आहे. भाजपकडून विरोधी पक्षांना विधेयकाच्या समर्थनासाठी आवाहन केले जात असताना काँग्रेससह तृणमूल काँग्रेस आणि ठाकरे गटाने याला विरोध दर्शवला आहे.
दरम्यान, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका काय असेल, याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे. यावर बोलताना सतेज पाटील म्हणाले की, शरद पवार यांच्या पक्षाने डिलिमिटेशनसाठी काही भूमिका घेतली आहे की नाही, याची माहिती नाही. मात्र, अजून तरी ते इंडिया आघाडीसोबत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबतच राहील, अशी अपेक्षा आहे.
डिलिमिटेशन म्हणजे भविष्यातील सत्तेचे केंद्र भाजपच्या बाजूने वळवण्याचा डाव असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. या विधेयकाचे देशाच्या राजकारणावर दूरगामी परिणाम होऊ शकतात. येत्या दोन दिवसांत इंडिया आघाडीची बैठक होऊन विधेयकाच्या साधक-बाधक परिणामांवर चर्चा केली जाईल आणि त्यानंतर भूमिका स्पष्ट केली जाईल, अशी माहितीही त्यांनी दिली.
महिला आरक्षणाला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा आहे. मात्र, महिला आरक्षणाच्या नावाखाली विधेयकाच्या माध्यमातून सत्ता काबीज करण्याचा प्रयत्न होत असेल, तर त्याला काँग्रेसचा कायम विरोध राहील, असे सतेज पाटील यांनी स्पष्ट केले. त्यामुळे संसदेच्या विशेष अधिवेशनात विरोधकांची भूमिका काय राहणार आणि या विधेयकावरून सत्ताधारी-विरोधकांमध्ये किती संघर्ष होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.








