---Advertisement---

डिझेलचे दर फक्त ३९ पैसे! जगातील स्वस्त इंधन कुठे?

Follow Us:
---Advertisement---

मुंबई वृत्तसंस्था – जागतिक ऊर्जा संकटामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ होत असताना भारतात डिझेलचे दर १०० रुपयांच्या पुढे गेले आहेत. मात्र, जगातील काही देशांमध्ये अवघ्या काही पैशांत एक लिटर डिझेल मिळत आहे. विशेष म्हणजे, एका देशात तर एक लिटर डिझेलची किंमत केवळ ३९ पैसे आहे. त्यामुळे भारत आणि या देशांमधील इंधन दरांमधील मोठी तफावत चर्चेचा विषय ठरत आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक बजेट कोलमडत आहे. मात्र, लिबिया, इराण आणि व्हेनेझुएला या देशांमध्ये पेट्रोल अत्यंत कमी दरात उपलब्ध आहे. ग्लोबल पेट्रोल प्राइसेस डॉट कॉमच्या आकडेवारीनुसार, लिबियामध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत अवघी २.१५ रुपये आहे. इराणमध्ये २.६५ रुपये, तर व्हेनेझुएलामध्ये ३.२५ रुपये प्रति लिटर दराने पेट्रोल मिळते.

डिझेलच्या किमती पाहिल्या तर आश्चर्याचा धक्का बसेल. व्हेनेझुएलामध्ये एक लिटर डिझेलसाठी केवळ ३९ पैसे मोजावे लागतात. इराणमध्ये हाच दर ५३ पैसे आहे. म्हणजेच या दोन्ही देशांमध्ये एका रुपयापेक्षाही कमी किमतीत एक लिटर डिझेल मिळते. तर लिबियामध्ये डिझेलचा दर २.१५ रुपये प्रति लिटर आहे.

भारतात कुठे मिळते सर्वात स्वस्त इंधन?

भारतातील इंधन दरांचा विचार केला तर अंदमान आणि निकोबार बेटांवरील पोर्ट ब्लेअर येथे सर्वात स्वस्त पेट्रोल-डिझेल मिळते. येथे पेट्रोलचा दर ८८.६६ रुपये, तर डिझेलचा दर ८४.५६ रुपये प्रति लिटर आहे. जागतिक स्तरावरील स्वस्त इंधनाच्या तुलनेत हे दर कितीतरी पटीने अधिक आहेत.

देशानुसार इंधनाचे दर वेगवेगळे का?

जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये मोठी तफावत असण्यामागे अनेक कारणे आहेत. कच्च्या तेलाचे उत्पादन, सरकारी अनुदान, कररचना, आयात-निर्यातीवरील निर्बंध आणि स्थानिक मागणी यांचा इंधनाच्या किमतींवर परिणाम होतो. तेल उत्पादक देशांमध्ये सरकारकडून इंधनावर मोठ्या प्रमाणात अनुदान दिले जात असल्याने तेथे दर कमी असू शकतात. तर अनेक विकसित देशांमध्ये कर आणि विविध शुल्कांमुळे इंधन महाग मिळते.

डिझेलच्या किमती वेगाने का वाढतात?

डिझेलच्या वाढत्या किमतीमागे त्याचा मोठ्या प्रमाणावर होणारा व्यावसायिक वापर हे महत्त्वाचे कारण आहे. पेट्रोलचा वापर प्रामुख्याने खासगी वाहने आणि दुचाकींमध्ये होतो. मात्र, डिझेलचा वापर ट्रक, मालवाहतूक, शेतीची यंत्रे, औद्योगिक उपकरणे आणि इतर व्यावसायिक कामांसाठी मोठ्या प्रमाणात केला जातो.

त्यामुळे डिझेलची मागणी तुलनेने स्थिर राहते. पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले किंवा जागतिक बाजारपेठेत तेलाच्या किमती वाढल्या तर डिझेलच्या दरांवर त्याचा मोठा परिणाम होतो. याचा फटका केवळ वाहनधारकांनाच नव्हे, तर मालवाहतूक, शेती आणि उद्योग क्षेत्रालाही बसतो. त्यामुळे जागतिक ऊर्जा संकटाच्या काळात डिझेलच्या किमती पेट्रोलच्या तुलनेत अधिक वेगाने वाढण्याची शक्यता असते.

Watch Our Latest Video

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now
Don`t copy text!