मुंबई, वृत्तसंस्था : दुष्काळ, शेतीमालाला कमी भाव आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या शेतकरी कुटुंबांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी राज्य सरकारने नवी योजना जाहीर केली आहे. ‘अनाथांचा नाथ.. दुष्काळग्रस्त शेतकरी रिक्षा सन्मान योजना’ अंतर्गत पुढील पाच वर्षांत तब्बल १ लाख प्रवासी रिक्षांचे वाटप करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली. २०२७ ते २०३१ या कालावधीत ही योजना राबविण्यात येणार असून, ३१० पेक्षा अधिक दुष्काळग्रस्त तालुक्यांतील अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी कुटुंबांना याचा लाभ मिळणार आहे.
या योजनेअंतर्गत रिक्षाच्या एकूण किंमतीच्या १० टक्के रक्कम धर्मवीर आनंद दिघे साहेब महाराष्ट्र प्रवासी वाहतूक चालक कल्याणकारी मंडळाकडून अनुदान स्वरूपात दिली जाणार आहे. उर्वरित ९० टक्के रक्कम राष्ट्रीयीकृत बँका, अनुसूचित बँका किंवा वित्तीय संस्थांकडून कर्जाच्या स्वरूपात उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत शेतकरी कुटुंबांना स्वतःचा रिक्षा व्यवसाय सुरू करण्याची संधी मिळणार आहे.
पहिल्या वर्षी २० हजार रिक्षांचे वाटप
योजनेच्या पहिल्या वर्षात २० हजार पात्र शेतकरी लाभार्थ्यांना रिक्षा देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. प्रत्येक तालुक्यात सरासरी ६० लाभार्थ्यांना रिक्षा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. एखाद्या तालुक्यात पात्र लाभार्थ्यांची संख्या कमी असल्यास उर्वरित रिक्षांचे वाटप त्याच जिल्ह्यातील अन्य तालुक्यांतील लाभार्थ्यांना करण्यात येणार आहे. पुढील वर्षी ९ फेब्रुवारी २०२७ रोजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त पात्र लाभार्थ्यांना रिक्षांच्या चाव्या देण्यात येणार असल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
संगणकीय लॉटरीद्वारे लाभार्थ्यांची निवड
योजनेसाठी मंडळामार्फत जाहिरात प्रसिद्ध करून अर्ज मागविण्यात येतील. प्राप्त अर्जांची कागदपत्रांच्या आधारे छाननी करून पात्र लाभार्थ्यांची यादी तयार केली जाईल. त्यानंतर संगणकीय लॉटरी पद्धतीने लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या लाभार्थ्यांचे प्रस्ताव बँकांकडे कर्जमंजुरीसाठी पाठविण्यात येतील. बँकेकडून ९० टक्के कर्ज मंजूर झाल्यानंतर मंडळाकडून १० टक्के अनुदान उपलब्ध करून दिले जाईल. वाहन खरेदीची रक्कम थेट अधिकृत विक्रेत्याला अदा केली जाणार आहे.
कोणाला मिळणार योजनेचा लाभ?
शासनाने दुष्काळग्रस्त घोषित केलेल्या क्षेत्रातील अल्प किंवा अत्यल्प भूधारक शेतकरी अथवा शेतकरी कुटुंबातील पात्र सदस्य या योजनेसाठी अर्ज करू शकतील. संबंधित कुटुंबाच्या नावावर शेती असल्याचा पुरावा आवश्यक राहणार आहे. यापूर्वी अशाच स्वरूपाच्या शासकीय योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच वाहन चालविण्याचा वैध परवाना किंवा नियमानुसार परवाना मिळविण्याची पात्रता असणे आणि बँकेच्या कर्जमंजुरीच्या अटी पूर्ण करणे आवश्यक असेल.
शेतीतील अनिश्चिततेवर मात करण्यासाठी शेतकरी कुटुंबांना उत्पन्नाचा पर्यायी स्रोत उपलब्ध करून देणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. रिक्षा व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण आणि निमशहरी भागातील शेतकऱ्यांना नियमित उत्पन्न मिळविण्याची संधी उपलब्ध होणार असून, आर्थिक स्वावलंबनाला चालना मिळण्याची अपेक्षा सरकारने व्यक्त केली आहे.







